Happy Birthday Raveena Tandon : सोशल मीडिया, इन्फ्ल्युएन्सर, पेड प्रमोशन यापैकी काहीही नसतानाही चाहत्यांच्या मनात स्थान पटकावणारी अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन. ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ या गाण्याने नव्वदीच्या दशकात रवीना घराघरात पोहोचली. ‘टिप टिप बरसा पानी’ मधील तिच्या घायाळ करणाऱ्या अदा अजूनही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. ‘आखियो से गोली मारो’ मधला तिचा आणि गोविंदाचा डान्स अजूनही भुरळ घालतो. अभिनय आणि नृत्य यांची सांगड घालत रवीनाने मनसोक्त मुशाफिरी केली. काळानुरूप बदलत रवीनाने वेगळ्या धाटणीच्या कलाकृतींमध्ये अभिनयाची चुणूक दाखवली. अरण्यकच्या निमित्ताने तिने ओटीटी माध्यमातही पाऊल टाकलं. वैयक्तिक आयुष्यात रवीनाच्या अक्षय कुमारबरोबरच्या अफेअर आणि ब्रेकअपची प्रचंड चर्चा झाली. मुलं दत्तक घेणं असो किंवा वाईल्डलाईफ फोटोग्राफी-रवीना आपल्या निर्णयातून,कृतीतून वेगळी ठरत गेली. आमिर-शाहरुख आणि सलमान या तिन्ही खानांची हिरॉइन म्हणून वावरलेली रवीना आज पन्नाशीचा टप्पा ओलांडते आहे. राष्ट्रीय पुरस्काररप्राप्त अभिनेत्रीच्या कारकीर्दीचा घेतलेला मागोवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रेम, साखरपुडा अन् ब्रेकअप, आता २२ वर्षांनी रवीना टंडन-अक्षय कुमार एकत्र दिसणार; अभिनेता म्हणाला, “आम्ही अनेक…”

रवीनाला अभिनेत्री व्हायचं नव्हतं

रवीना टंडनचा जन्म २६ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबईत चित्रपट निर्माते रवी टंडन आणि वीणा टंडन यांच्या पोटी झाला. ती अभिनेते मॅक मोहन यांची भाची आहे. रवीनाला राजीव टंडन नावाचा भाऊ आहे. कौटुंबीक पार्श्वभूमी चित्रपटसृष्टीशी संबंधित असली तरी कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं, असं एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं. आपण चुकून या क्षेत्रात आल्याचं ती म्हणाली होती.

रवीना चित्रपटांमध्ये कशी आली?

‘मिड-डे’ ला दिलेल्या मुलाखतीत रवीना म्हणाली होती, “चित्रपटात येण्यापूर्वी मी एका स्टुडिओमध्ये काम करायची आणि तिथे मी फरशी पुसण्याचे आणि उलटी साफ करण्याचेही काम केले. स्टुडिओत लोकांनी केलेली घाण मी साफ करायचे. मी दहावीपासून प्रल्हाद कक्कर यांना असिस्ट करायला सुरुवात केली. जेव्हा प्रल्हाद यांच्या सेटवर मॉडेल नसायच्या, तेव्हा ते म्हणायचे रवीनाला बोलवा. ते मला माझा मेकअप करायला सांगायचे आणि मग मी फोटोसाठी पोज देऊ लागले. मग मला वाटले की हे सगळं मला करायचं आहे तर मग प्रल्हादसाठी मी हे फुकटात का करू? मी त्यातून पैसे कमवू शकते. अशा रितीने मी मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर मला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या.”

मित्रांमुळे स्वीकारलेला पहिला सिनेमा

वडील चित्रपट निर्माते होते, पण त्यांनी मला लाँच करावं, असं मला कधीच वाटलं नाही असं रवीनाने सांगितलं. ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत रवीना म्हणाली होती, “मला चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. पत्थर के फूल या पहिल्या चित्रपटासाठी होकार देण्यापूर्वी मी ६-७ चित्रपट नाकारले होते. सलमान खानमुळे मी हा चित्रपट केला. माझ्या कॉलेजमधील मित्रांना सलमान खानला भेटायचं होतं, त्यामुळे मी हा चित्रपट स्वीकारला होता. मी कधीही अभिनय, डान्स किंवा डायलॉग कसे बोलण्याचे याचे प्रशिक्षण घेतलेले नाही.”

रवीनाने अवघ्या २१ व्या वर्षी दत्तक घेतलेल्या दोन मुली

१९९५ साली रवीना फक्त २१ वर्षांची होती आणि अविवाहित होती, तेव्हा तिने तिच्या नातेवाईकांच्या मुली पूजा आणि छाया दोघींना दत्तक घेतलं होतं. तेव्हा पूजा ११ वर्षांची होती आणि छाया ८ वर्षांची होती. तेव्हा एकट्या स्त्रियांना मुलं दत्तक घेता यायची नाहीत, त्यामुळे सुरुवातीला आपली आई मुलींची कायदेशीर पालक होती, असं रवीनाने सांगितलं होतं. दरम्यान, रवीनाच्या दोन्ही दत्तक मुलींची आता लग्नं झाली आहेत. रवीनाला रुद्र नावाचा नातू देखील आहे. तो छायाचा मुलगा आहे.

अक्षय कुमारशी ब्रेकअप

अक्षय आणि रवीना यांनी १९९४ मध्ये आलेल्या ‘मोहरा’ चित्रपटात एकत्र काम केले होते. अक्षय-रवीनाचं ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं तर आजही तितकंच लोकप्रिय आहे. ‘मोहरा’ व्यतिरिक्त त्यांनी ‘मैं खिलाडी तू अनाडी’ आणि ‘खिलाडियों का खिलाडी’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले. दोघांनी साखरपुडा केला होता आणि ते लग्नही करणार होते, पण त्यापूर्वीच त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. अक्षयची रेखाशी जवळीक वाढल्याने त्यांच्या नात्यात दुरावा आला होता, असं म्हटलं जातं. रवीनाचं रेखा यांच्याशी भांडण झालं होतं. ब्रेकअपनंतर रवीनाने चित्रपट वितरक अनिल थडानीशी लग्नगाठ बांधली आणि अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. ब्रेकअपनंतर २२ वर्षांहून अधिक काळानंतर अक्षय व रवीना वेलकम टू द जंगल’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत.

अक्षय व तिच्या ब्रेकअपबद्दल काय म्हणालेली रवीना टंडन?

काही महिन्यांपूर्वी ‘एएनआय’शी बोलताना रवीना म्हणाली, “इतकी वर्षे उलटली आहे, पण जेव्हा माझं नाव गुगल केलं जातं, तेव्हा त्याचं नावही येतं, त्या चॅप्टरचा उल्लेख होतोच. पण, मी त्याच्या आयुष्यातून निघून गेले होते, त्यामुळे सर्व गोष्टी अर्थहीन ठरतात. कारण मी आधीच दुसर्‍याला डेट करत होते आणि तोही दुसर्‍या कुणाला तरी डेट करत होता, मग मला वाईट का वाटेल? ‘मोहरा’ नंतर आम्ही एक हिट जोडी होतो आणि आताही, जेव्हा आम्ही सर्वजण एकमेकांना कुठेतरी भेटतो, आम्ही सर्व एकमेकांशी बोलतो. खरं तर प्रत्येकजण आयुष्यात पुढे जातो, लोकांचे घटस्फोट होतात, ते मूव्ह ऑन करतात, साखरपुडा मोडणं ही काय खूप मोठी गोष्ट आहे का?” असं रवीना म्हणाली होती.

रवीना टंडनने अक्षय कुमारशी मोडलेल्या साखरपुड्याबद्दल तब्बल २२ वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “त्याच्या आयुष्यातून…”

रवीना व अनिल थडानीची प्रेम कहाणी

‘लेहरेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने पती अनिल थडानीबरोबरच्या तिच्या प्रेमकथेबद्दल खुलासा केला. तिने अनिलला पहिल्यांदा एका व्हॅलेंटाईन डे पार्टीमध्ये पाहिलं होतं. परंतु त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. “आम्ही भेटलो आणि आम्ही ४ ऑगस्ट २००३ रोजी बोलू लागलो आणि फेब्रुवारी २००४ मध्ये आमचे लग्न झाले,” असं तिने सांगितलं. अनिलने तिचा पहिला चित्रपट ‘पत्थर के फूल’ चे वितरण केले होते हे तिला माहीत नव्हतं, पण जेव्हा ती ‘स्टम्प्ड’ नावाचा चित्रपट बनवत होती तेव्हा त्यांची पहिली भेट झाली आणि दोघे कामासाठी भेटले होते असं रवीना म्हणाली होती.

वाइल्ड लाइफ फोटोग्राफर आहे रवीना

रवीनाला अभिनयाबरोबर वाइल्ड लाइफ फोटोग्राफीची खूप आवड आहे. जवळपास २० वर्षांपासून ती फोटोग्राफी करते. तिच्या इन्स्टाग्रामवर तिने काढलेले काही फोटो पाहायला मिळतात. तसेच काला घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये रवीनाने काढलेल्या काही निवडक फोटोंचं २०१८ मध्ये प्रदर्शन करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर ती राज्याची वन्यजीव सदिच्छा दूतदेखील आहे. याशिवाय कानपूर अभयारण्यानं तिथल्या एका छोट्या वाघिणीला रवीना टंडनचं नाव दिलंय. रवीनाने या अभयारण्यातील प्राण्यांसाठी पाठवलेल्या मदतीनंतर तिथल्या वाघिणीचं नाव रवीना ठेवण्यात आलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday raveena tandon breakup with akshay kumar married to anil thadani wildlife photographer adopting girls hrc
Show comments