या वर्षीच्या सुपरहिट वेब सीरिजपैकी एक म्हणजे ‘ज्युबिली’ होय. ६० च्या दशकातील सिनेसृष्टीवर आधारित या सीरिजमध्ये प्रसेनजित चॅटर्जी, अदिती राव हैदरी, अपारशक्ती खुराना, नंदिश संधू असे कलाकार होते. यामध्ये ‘निलोफर’ ही भूमिका साकारून भाव खाऊन गेलेली अभिनेत्री म्हणजे वामिका गब्बी. तिचा आज वाढदिवस आहे. एक दशकाहून अधिक काळापासून अभिनय इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या वामिकाला प्रचंड संघर्षानंतर यश मिळालं. तिला आयुष्यात खूप वेळा नकाराचा सामना करावा लागला. एकवेळ अशीही आली होती की तिने हार मानली होती, पण तीन दिवसांच्या एका वर्कशॉपनंतर तिचं मत आणि आयुष्य दोन्ही बदललं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – कपूर खानदानाचा बिनधास्त आविष्कार ‘बेबो’

वामिकाचा जन्म २९ सप्टेंबर १९९३ रोजी चंदीगडमध्ये झाला होता. तिचे वडील गोवर्धन गब्बी हे पंजाबी लेखक आहेत आणि तिची आई राज कुमारी शिक्षणतज्ज्ञ आहेत. तिचा धाकटा भाऊ हार्दिक हा देखील एक अभिनेता आणि संगीतकार आहे. वामिकाला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. ती पहिल्यांदा २००७ मध्ये करीना कपूर आणि शाहिद कपूरच्या ‘जब वी मेट’ चित्रपटात दिसली होती. यात तिने करीना कपूर म्हणजेच गीतच्या चुलत बहिणीची भूमिका केली होती. यानंतर ती अनेक हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये दिसली. पण तिला हवं तसं यश मिळालं नाही. आपल्याला करिअरमध्ये कराव्या लागलेल्या संघर्षाबाबत वामिकाने ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं होतं.

हेही वाचा – अलौकिक स्वरांची अनुभूती देणाऱ्या गानसम्राज्ञी!

वडिलांचा पाठिंबा असल्याने दडपण नव्हतं – वामिका

“मी पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा मी योग्य निर्णय घेतल्याचं मला वाटलं होतं. पण नंतर माझे खूप सारे गैरसमज दूर झाले. खरं तर माझ्यावर काम मिळवण्याचं दडपण नव्हतं, माझ्या आवडीला वडिलांचा पाठिंबा होता. ते मला नेहमी म्हणतात की तेच काम करायचं, जे करून आपल्याला आनंद मिळतो. इंडस्ट्रीत ७-८ वर्षे संघर्ष करत छोट्या-छोट्या भूमिका साकारल्यानंतर २०१९ मध्ये मला वाटलं की मला कामात आनंद मिळत नाही आहे. मी अभिनय शिकले नव्हते, त्यामुळे मला स्वतःच्या क्षमतेबद्दल माहीत नव्हतं. त्यामुळे मी खचले. मला चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळणार नाही, कदाचित ते माझ्या नशिबातच नाही असं मी समजले. २०१९ मध्ये मी ठरवलं की पैसे कमवायला प्रादेशिक सिनेमे करेन आणि जगभर फिरेन. याच दरम्यान कदाचित मला एखादी गोष्ट आवडू लागेल आणि मी तेच करेन.”

तीन दिवसात अभिनयाच्या पुन्हा प्रेमात पडले – वामिका

पुढे ती म्हणाली, “मी सिलेक्ट होणार नाही हीच भावना मनात ठेवून नंतरच्या काळात ऑडिशन दिल्या. त्यामुळे मी निवांत होते, मला चिंता नव्हती, दडपण नव्हतं. नंतर मी ऑडिशनमध्ये पास होऊ लागले. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘मिडनाइट चिल्ड्रेन’ नावाच्या शोसाठी मी ऑडिशन पास झाले. नंतर त्यांनी मला तीन दिवसांच्या वर्कशॉपसाठी पाठवले. माझ्याबरोबर ऑडिशन पास झालेल्या इतर मुलीही होत्या. अतुल मोंगिया या अभिनय प्रशिक्षकांकडे आम्हाला पाठविण्यात आलं होतं. माझी निवड होणार नाही, हेच मनात ठेवून मी तिथे गेले होते. पण त्या तीन दिवसांत मी पुन्हा अभिनयाच्या प्रेमात पडले, मला अभिनय आवडू लागला. नंतर माझा अभिनय व स्वत:च्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. मी काळजी करणं सोडल्यावर सर्व गोष्टी आपोआप चांगल्या घडू लागल्या.”

आवडते कलाकार कोणते?

“मी देवदास चित्रपटाची मोठी चाहती आहे. मी तो चित्रपट अनेकदा पाहिला आहे. मला ऐश्वर्या राय खूप आवडते. हृतिक रोशनने त्याच्या करिअरमध्ये ज्या विविधांगी भूमिका साकारल्या, त्या खूपच उत्तम होत्या. तसेच कंगना रणौत खूपच उत्तम अभिनेत्री आहे. तिने अभिनेत्री म्हणून मला खूप प्रेरित केलं. इरफान खान यांचा सहज अभिनय, रणवीर सिंगने ज्याप्रमाणे कपिल देव यांची भूमिका साकारली ती खूपच सुंदर होती. तब्बूही खूप आवडते,” असं वामिका आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल बोलताना म्हणाली.

वामिकाने आतापर्यंत ‘माई’, ‘ज्युबिली’, ‘चार्ली चोप्रा’, ‘खुफिया’, ‘मॉडर्न लव्ह चेन्नई’ अशा अनेक चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday wamiqa gabbi movie jab we met khufiya career struggle favourite actress hrc
Show comments