Ramdev Baba Mahakumbh Video: प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिवेणी संगममध्ये पवित्र स्नान करण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून कोट्यवधी भाविक दररोज श्रद्धेने येत आहेत. प्रयागराजमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी बॉलीवूड आणि राजकीय जगतातील अनेक कलाकार येत आहेत. अभिनेत्री आणि भाजा खासदार हेमा मालिनी यांनी २९ जानेवारी रोजी प्रयागराजमधील महाकुंभमध्ये हजेरी लावली. मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर त्रिवेणी संगम येथे त्यांनी पवित्र स्नान केले. यावेळी हेमा मालिनी यांच्याबरोबर बाबा रामदेवही होते. त्यांचा पवित्र स्नान करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओत हेमा मालिनी रामदेव बाबा यांच्या एका कृतीवर खूप हसताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रामदेव बाबा आणि हेमा मालिनी कुंभमेळ्यात एकत्र उभे दिसत आहे. यादरम्यान, त्रिवेणी संगम येथे पाण्यात डुबकी मारताना, रामदेव बाबा त्यांचे लांब केस वेगाने झटकतात. यावेळी त्यांचे ओले केस थेट त्यांच्या मागे उभ्या असलेल्या साधूच्या डोक्याला लागतात. हे पाहून रामदेव यांच्या शेजारी उभ्या असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी हसू लागतात. त्यानंतर खुद्द रामदेव बाबाही हसायला लागतात. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ –

खासदार हेमा मालिनी सोमवारी संध्याकाळी महाकुंभमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांनी जुनापिठाधीश्वर महामंडलेश्वर आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांची भेट घेतली आणि अध्यात्मावर चर्चा केली. त्यानंतर बुधवारी मौनी अमावस्या असल्याने हेमा मालिनी यांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. “मला खूप चांगलं वाटत आहे. असा अनुभव मला याआधी कधीच आला नव्हता. आजचा दिवस खूप खास आहे आणि मला पवित्र स्नान करण्याचे भाग्य लाभले, यासाठी मी आभारी आहे,” असं हेमा मालिनी पवित्र स्नान केल्यानंतर म्हणाल्या.

आत्तापर्यंत सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी महाकुंभात स्नान केले आहे. या यादीत अनुपम खेर, मिलिंद सोमण, कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर यांचाही समावेश आहे. तसेच कोल्डप्लेचा गायक ख्रिस मार्टिन आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री डकोटा जॉन्सन हे देखील महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराजमध्ये आले होते. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात ते दोघेही पारंपरिक पोशाखात प्रयागराजमध्ये फिरताना दिसले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hema malini laughed at ramdev baba pavitra snan at mahakumbh 2025 video viral hrc