ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी दोन लग्नं केली आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलं सनी व बॉबी अभिनेते आहेत, तर त्यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी या अभिनेत्री असून त्यांच्या मुली इशा व अहाना दोघीही सिनेसृष्टीशी संबंधित आहेत. धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबात मतभेद असल्याच्या चर्चा होत्या. सनी देओलचा मुलगा करणचं जून महिन्यात लग्न झालं, त्यावेळी हेमा मालिनी व त्यांच्या मुली हजर नव्हत्या. त्यानंतर याबद्दल खूप चर्चा झाली होती.
सध्या सनी देओल त्याच्या ‘गदर २’ या चित्रपटाचं यश साजरं करत आहे. दोन्ही कुटुंबात वाद असल्याची चर्चा असतानाच काही दिवसांपूर्वी इशा देओलने ‘गदर २’ चं स्पेशल स्क्रिनिंग ठेवलं होतं, त्या स्क्रिनिंगला सनी व बॉबी पोहोचले होते, तसेच अहानादेखील हजर होती. इतकंच नाही तर इशाने सोशल मीडियावर ‘गदर २’ चा ट्रेलर शेअर करत तिच्या सावत्र भावाचं कौतुक केलं होतं. स्क्रिनिंग इव्हेंटमधील या भावंडांचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते.
‘गदर २’ ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. हा चित्रपट पाहायला सनी देओलच्या सावत्र आई म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी गेल्या होत्या. त्यांनी सनीच्या अभिनयाचं कौतुकही केलं होतं. त्यानंतर आता दोन्ही कुटुंबातील मतभेदांच्या चर्चांबाबत हेमा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यूज १८ शी बोलताना हेमा म्हणाल्या, “मला खूप आनंद वाटतोय, खरं तर यात काही नवीन आहे, असं वाटत नाही. कारण ते अगदी सामान्य आहे. बऱ्याचदा ते (सनी व बॉबी) घरी येतात, पण आम्ही ते फोटोही कुठेही प्रकाशित करत नाही. आमचं कुटुंब फोटो काढून लगेच इन्स्टाग्रामवर टाकणारं नाही.”
इशाने सनी न बॉबीबरोबरचा फोटो शेअर केला होता. त्यावरही हेमा यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही सगळे एकत्र आहोत, नेहमीच एकत्र होतो. कोणतीही समस्या असो, आम्ही नेहमीच एकमेकांसाठी हजर असतो. आता मीडियालाही माहीत झालं आणि ते बरं झालं. आम्ही वेगळे झालो आहोत, असं लोक बोलतात, ते पाहून मला आश्चर्य वाटतं. कारण आम्ही नेहमी एकमेकांसोबत आहोत, आमचं संपूर्ण कुटुंब एक आहे. काही कारणास्तव आम्ही करणच्या लग्नाला येऊ शकलो नाही, ती वेगळी गोष्ट आहे. पण सनी, बॉबी नेहमी रक्षाबंधनाच्या वेळी घरी येतात,” असं हेमा मालिनी यांनी सांगितलं.