१९७० आणि १९८० च्या दशकात सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केलेल्या हेमा मालिनी यांना १९९० च्या दशकात दिग्दर्शनात आपले नशीब आजमवायचे होते. १९९२ मध्ये त्यांनी ‘दिल आशना है’ हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यात त्यावेळचा सर्वांत चर्चेत असलेला नवोदित अभिनेता शाहरुख खानला प्रमुख भूमिकेत घेतले.या चित्रपटातील एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्यासाठी हेमा यांना पती धर्मेंद्र यांना घ्यायचे होते. पण, धर्मेंद्र यांनी पत्नीच्या दिग्दर्शनाखाली काम करण्यास नकार दिला.
राम कमल मुखर्जी लिखित ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या चरित्रग्रंथात हेमा यांनी या घटनेबद्दल सविस्तर सांगितले आहे. हेमा यांनी सुरुवातीला विनोद खन्ना यांना भूमिकेसाठी विचारले होते. त्यानंतर हेमा यांनी अमिताभ बच्चन यांनाही या भूमिकेसाठी विचारले, परंतु त्या वेळी बिग बींनी चित्रपटसृष्टीतून काही काळ विश्रांती घेतली असल्याने त्यांनीही हा प्रस्ताव नाकारला.
त्यानंतर हेमा यांनी पती धर्मेंद्र यांना या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी विचारले. परंतु धर्मेंद्र यांनी हेमा यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्यास स्पष्टपणे नकार दिला. चित्रपटाच्या मुहूर्त समारंभाला धर्मेंद्र हे अनुपस्थित असल्याने याबाबत सिनेसृष्टीत आणि माध्यमांत अनेक चर्चा रंगल्या. हेमा यांनी या बाबत सांगितले, “मला धर्मेंद्रजींना चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका द्यायची होती, पण त्यांनी माझ्या दिग्दर्शनाखाली काम करण्यास नकार दिला. चित्रपटाच्या मुहूर्ताला धर्मेंद्रजी येऊ शकले नाहीत, त्यामुळे अनेकांनी यावर उलटसुलट चर्चा केल्या, पण त्यात काहीही तथ्य नव्हते. ते त्या वेळी अमेरिकेत होते म्हणून हजर राहू शकले नाहीत. दररोज मी त्यांना चित्रपटाच्या घडामोडींची माहिती द्यायचे, त्यांनी मला नेहमीच खंबीर पाठिंबा दिला. माझ्या दोन्ही मुलींनाही या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता होती.”
धर्मेंद्र यांनी नंतर चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च आणि प्रीमियर समारंभाला हजेरी लावून हेमा मालिनींच्या कामाला पाठिंबा दिला. ‘दिल आशना है’ मध्ये शाहरुख खान आणि दिव्या भारती प्रमुख भूमिकेत होते. त्यांच्याबरोबर मिथुन चक्रवर्ती, जितेंद्र, डिंपल कपाडिया, आणि अमृता सिंग यांसारखे प्रसिद्ध कलाकारही या चित्रपटाचा भाग होते.
© IE Online Media Services (P) Ltd