दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र हे इतर लग्न झालेल्या जोडप्यांसारखे नव्हते. हेमा मालिनी यांच्याबरोबर धर्मेंद्र यांचे दुसरे लग्न होते. ईशा देओल आणि आहाना देओलला याबद्दल माहीत नव्हते. आता त्यांना याबद्दल कसे कळले, याचा खुलासा एका पुस्तकात केला आहे.

“पण, मला कधी याबद्दल वाईट वाटले नाही”

राज कमल मुखर्जी यांनी हेमा मालिनी यांची बायोग्राफी लिहिली आहे. याचे नाव ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रिम गर्ल’ असे आहे. यामध्ये ईशा देओलने सांगितलेली आठवण लिहिली आहे. ईशाने म्हटले होते, “जेव्हा मी चौथ्या इयत्तेत होते, त्यावेळी माझ्या एका वर्गमित्राने विचारले होते, तुला दोन आई आहेत ना? तो प्रश्न ऐकल्यानंतर मला धक्का बसला होता. मी लगेच त्याला उत्तर देत म्हटले, “मला एकच आई आहे”, पण जशी मी शाळेतून घरी आले, तसे लगेच याबद्दल आईला सांगितले. मला वाटते तो क्षण होता, ज्यावेळी आईने मला खरे सांगायचे ठरवले. कल्पना करा, आम्ही चौथीमध्ये होतो आणि याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नव्हती. आजची मुलं स्मार्ट आहेत”, असे म्हणत ईशाने सांगितले की, तिच्या आईने हेमाने त्यावेळी तिला सांगितले तिच्या वडिलांचे दुसरे एक कुटुंब आहे.

पुढे याबद्दल ईशाने सांगितले होते, “मला समजले की माझ्या आईने अशा व्यक्तीशी लग्न केले आहे, ज्यांचे आधीच कोणाबरोबर तरी लग्न झाले आहे आणि त्यांचेदेखील कुटुंब आहे. पण, मला कधी याबद्दल वाईट वाटले नाही. आजपर्यंत मला असे कधी वाटले नाही की, यामध्ये काहीतरी चुकीचे आहे. त्याचे श्रेय मी माझ्या पालकांना देते, ज्यामुळे आम्हाला कधी अवघडलेपण वाटले नाही.”

हेही वाचा: “बिग बॉसच्या घरात मी कधीच…”, अपूर्वा नेमळेकर मानसिक आरोग्यावर बोलताना म्हणाली, “लोकांना माझ्यातील चिडकी…

ईशाने म्हटले होते, “वडील यायचे, त्यांच्याबरोबर जेवायचे पण ते राहायचे नाहीत. जर कधी थांबलेच तर आम्हाला आश्चर्य वाटायचे, ते ठीक आहेत का असेही वाटायचे. जेव्हा माझे वय लहान होते, तेव्हा मी माझ्या मित्र-मैत्रिणींच्या घरी जायचे, तेव्हा त्यांचे दोन्ही पालक त्यांच्या आजूबाजूला असलेले पाहायचे. तेव्हा ती गोष्ट लक्षात आली की वडिलांचे आजूबाजूला असणे सामान्य गोष्ट आहे. पण, त्याचा फारसा परिणाम आमच्यावर झाला नाही. माझी आई माझ्याजवळ असण्याने मी खूप समाधानी होते आणि माझ्या वडिलांवर माझे खूप प्रेम होते.”

दरम्यान, धर्मेंद्र यांनी जेव्हा हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले, त्यावेळी त्यांचे अगोदरच प्रकाश कौर यांच्याशी लग्न झाले होते. त्यांना चार मुले होती.