बॉलिवूड अभिनेता इम्रान हाशमीचे चित्रपट २ गोष्टींमुळे सुपरहीट ठरले, एक म्हणजे त्यातील बोल्ड सीन्स आणि दुसरं म्हणजे त्यातील गाणी. त्याला सुपरहीट गाणी देण्याचं काम केलं संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाने. हिमेश संगीतकार म्हणून प्रथम पुढे आला आणि त्याने उत्तमोत्तम अल्बम प्रेक्षकांना दिले. पण जेव्हा त्याने अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून नशीब आजमावायचं ठरवलं तेव्हा मात्र प्रेक्षकांना ते काही अजिबात पटलं नाही.
२००८ साली हिमेशने ऋषि कपूरच्या ‘कर्ज’चा रिमेक केला जो बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला, त्यानंतर त्याने स्वतःच्याच एका हिट गाण्याच्या अल्बमच्या नावाने एक नाही दोन चित्रपट काढले ते म्हणजे ‘तेरा सुरूर’ आणि ‘आप का सुरूर’. हे दोन्ही चित्रपटही सुपरफ्लॉप ठरले. तरीही हिमेशने ‘दमादम’, ‘कजरा रे’, ‘रेडियो’, सारख्या फ्लॉप चित्रपटांचा सपाटा सुरुच ठेवला. त्याच्या ‘खिलाडी ७८६’ आणि ‘द एक्स्पोज’ या दोन चित्रपटांनाच थोडंफार यश मिळालं.
आणखी वाचा : ‘हा’ अभिनेता साकारणार होता ‘कांतारा’मधील मुख्य भूमिका पण… दिग्दर्शक रिषभ शेट्टीचा खुलासा
आता हिमेश पुन्हा एक चित्रपट घेऊन येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचं नाव आहे ‘बॅडएस रवी कुमार’, आणि हा चित्रपट त्याचया ‘ द एक्स्पोज’चा स्पिन ऑफ चित्रपट असणार आहे. ३ मिनिटाच्या या टीझरमध्ये फक्त चित्रपटाचं नाव लोकांसमोर आलं आहे. हिमेशच्या इतर चित्रपटांप्रमाणे यातही बरेच फिल्मी डायलॉग आणि जबरदस्त अॅक्शन बघायला मिळत आहे. शिवाय चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेत्री यांची नावं ४ नोव्हेंबरला समोर येणार आहेत. नेटकरी मात्र हा टीझर पाहून चांगलेच वैतागले आहेत.
सोशल मिडियावर या चित्रपटाच्या टीझरची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. यातील व्हीएफएक्स, गाणी, डायलॉग यावर विनोद शेअर केले जात आहेत. एवढंच नाही तर हिमेशवरसुद्धा लोकं सडकून टीका करत आहेत. समीक्षक अभिनेता कमाल आर खाननेदेखील या चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. केआरके म्हणाला, “यामध्ये सगळं हिमेशच करणार आहे, आणि चित्रपटही फक्त हिमेशच पाहणार आहे. हा चित्रपट माझ्या ‘देशद्रोही’ चित्रपटाचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढणार आहे. यासाठी हिमेशचे आभार.”
एकीकडे ‘कांतारा’सारख्या चित्रपटांसाठी लोक गर्दी करत असताना बॉलिवूडकर अजूनही असे चित्रपट का काढत आहे? असा सवालही कित्येक नेटीजन्सनी केला आहे. एकूणच हिमेशच्या या नवीन चित्रपटावरून त्याला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी चित्रपटगृहात झळकणार आहे.