यंदाचं वर्षं बॉलिवूडसाठी अत्यंत वाईट होतं असंच चित्र समोर उभं राहतं आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘उंचाई’ने बॉलिवूडची नाव किनाऱ्यावर आणायचा प्रयत्न केला आहे, पण एकूणच सध्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या वादळात बॉलिवूड आणि हिंदी चित्रपट सपशेल आपटले आहेत हे मात्र नक्की. कित्येक चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांनीदेखील ही गोष्ट मान्य केली आहे.
नुकतंच गीतकार प्रसून जोशी यांनी याबद्दल वक्तव्य केलं आहे. लेखक आणि सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशी यांनी हिंदी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील निराशाजनक कामगिरीबद्दल खेद व्यक्त केला आहे. बॉलीवूडचे बहुतेक चित्रपट का फ्लॉप होत आहेत याविषयीही ते बोलले, शिवाय चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेवर त्यांनी टिप्पणी केली. अनेक हिंदी चित्रपटांना बहिष्काराचाही सामना करावा लागला आहे आणि त्यामुळेसुद्धा चित्रपटांना चांगलाच फटका बसला आहे.
आणखी वाचा : “भारतीय महिला पाश्चात्य कपडेच का परिधान करतात?” लेक आणि नातीच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांचा सवाल
साहित्य आज तक २०२२ या कार्यक्रमात प्रसून जोशी यांनी वक्तव्य केलं की, “एक काळ असा होता की बॉलीवूड चित्रपटांवर साहित्य आणि पौराणिक कथांमधून कथा यांचा प्रचंड प्रभाव होता. या कथा त्यांच्या मुळाशी जोडलेल्या होत्या. कालांतराने बॉलिवूड स्वतःच्याच विश्वात मश्गुल होत गेलं आणि त्यामुळेच त्यांचा इतर गोष्टींशी संपर्क तुटला. उदाहरण द्यायचे झाले तर या इंडस्ट्रीत प्रामुख्याने फक्त मुंबईचे लोक आहेत, त्यापैकी अनेकांनी खऱ्या आयुष्यात शेतकरी पाहिलेला नाही. पण नंतर ही मंडळी जेव्हा शेतकरी चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा त्यांनी दाखवलेल शेतकरी हा त्यांच्या मुळांपासून दूर गेलेला आहे याची त्यांना जाणीव नाही.”
प्रसून जोशी हे लेखक आणि कवी आहेत ज्यांना दोनवेळा सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. २०१७ मध्ये, त्यांची पहलाज निहलानी यांच्या जागी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली जे सर्व भारतीय चित्रपटांच्या प्रमाणपत्राची जबाबदारी संभाळतात.