बॉलिवूड चित्रपट आणि वाद आता हे समीकरणच बनले आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाला ट्रोल केलं जात आहे. रामायण मालिकेतील कलाकारांनीदेखील या चित्रपबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आता या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाला आता उच्च न्यायालयात एका संघटनेने खेचले आहे.
आदिपुरुषचे निर्माते आणि कलाकारांविरोधात ‘हिंदू सेना’ नावाच्या संघटनेने बुधवारी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. भगवान राम, सीता, हनुमान, रावण आणि इतरांशी संबंधित ‘आक्षेपार्ह मजकूर’ असल्याचा दावा करते ते काढून टाकण्याची मागणी या याचिकेमध्ये केली आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत पुढे म्हटले आहे की, ‘चित्रपटात धार्मिक व्यक्तिरेखा अयोग्य आणि चुकीच्या पद्धतीने दाखवून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत’.
अजय देवगणच्या ‘त्या’ फोटोवर मराठी अभिनेत्याची कमेंट चर्चेत; म्हणाला, “मला अत्यंत…”
या चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादात विविध संघटनेच्या साधू संतांनी भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटात सनातन धर्माची विटंबना केली आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड बरखास्त करुन ‘सनातन सेन्सॉर बोर्ड’ स्थापन करावा, अशी मागणी अखिल भारतीय संत समितीने दिली आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये हिंदू देवीदेवतांचे चुकीच्या पद्धतीने चित्रण केले जात असून त्यावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे संतांचे म्हणणं आहे. प्रभासचा श्रीराम यांचा लूक आणि सैफ अली खानच्या रावणाच्या लूकवरुन प्रेक्षकांमध्ये सध्या कामालीची नाराजी पाहायला मिळत आहे. चित्रपटातील व्हीएफएक्सवरुन तर लोकं टीका करतच आहेत. पण रावणाच्या लूकमुळे प्रेक्षक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.
‘आदिपुरुष’ चित्रपटात सैफ अली खान आणि प्रभाससह बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘सिता’ हे पात्र ती साकारणार आहे. ‘सोनू के टिटू की स्वीटी’ फेम अभिनेता सनी सिंग चित्रपटात ‘लक्ष्मणा’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने ‘हनुमाना’ची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.