प्रसिद्ध रॅपर हनी सिंग नेहमीच त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत असतो. आता गर्लफ्रेंडबरोबर एका कार्यक्रमात दिसल्याने पुन्हा एकदा त्याच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच हनी सिंगचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर हनी सिंग पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. पत्नी शालिनी तलवारपासून घटस्फोट घेतल्यानंतर आता तो मॉडेल टीना थडानीला डेट करत आहे. गर्लफ्रेंडचा हात पडकडून चालणाऱ्या हनी सिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
हनी सिंगने दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात गर्लफ्रेंड टीनासह हजेरी लावली. यावेळी सर्वांसमोर त्याने टीनाचा हात पकडलेला दिसला. मागच्या बऱ्याच काळापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या पण ते पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हनी सिंगने नात्याची सार्वजनिक कबुली दिल्याचं बोललं जात आहे. या व्हिडीओमध्ये टीना खूपच स्टनिंग दिसत आहे. तसेच तिच्या हातात महागड्या ब्रँडची पर्स होती ज्याची किंमत जवळपास २.५ लाख रुपये एवढी सांगितली जात आहे.
सोशल मीडियावर हनी सिंग आणि टीना थडानी यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, “नव्या गर्लफ्रेंडसाठी शुभेच्छा मी तुझ्यासाठी खूप खुश आहे.” दुसऱ्या एका युजरने कमेंट केली, “तुझी बायको खरंच बोलत होती की तुझी गर्लफ्रेंड आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “नव्या गर्लफ्रेंडला सर्वांसमोर आणण्यासाठीच तू घटस्फोट घेतला आहे.” याशिवाय अनेकांनी हनी सिंग जुन्या लूकमध्ये परतल्याने चाहते आनंदी असल्याचं दिसून येत आहे.
आणखी वाचा- प्रसिद्ध रॅपर हनी सिंग आणि पत्नी शालिनीचा घटस्फोट; गायकाने पोटगी म्हणून दिली ‘इतकी’ रक्कम
दरम्यान हनी सिंगची गर्लफ्रेंड टीना थडानी त्याच्या ‘पॅरिस का ट्रिप’ या गाण्यात दिसली होती. तर हनी सिंगने पत्नी शालिनी तलवारपासून २०२२ मध्येच घटस्फोट घेतला होता. शालिनीने हनी सिंगवर अनेक गंभीर आरोप लावले होते. हनी सिंगने आपल्याला मारहाण केली तसेच त्याच्या वागण्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर बराच परिणाम झाल्याचं शालिनीने म्हटलं होतं. याशिवाय त्याने नात्यात विश्वासघात केल्याचा आणि पैशाचा फ्रॉड केल्याचाही आरोप शालिनीने लावला होता. त्यानंतर हनी सिंगने हे सर्व आरोप फेटाळले होते.