पंजाबी म्यूझिक इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत रॅपर म्हणून यशस्वी प्रवास करणाऱ्या हनी सिंगला आता कोणाच्या ओळखीची गरज नाही. आपल्या गाण्यावर सर्वांना थिरकायला लावणाऱ्या हनी सिंगने करिअरमध्ये बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. पण मधल्या काही वर्षांमध्ये तो संपूर्ण इंडस्ट्रीमधून पूर्णपणे गायब झाला होता. अनेकांना त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि आता सर्वांनाच त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
नुकतंच हनी सिंगने युट्यूबच्या ‘द बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याने धमाल गप्पा मारल्या. शिवाय मुंबई महाराष्ट्राशी निगडीत काही गोष्टींचा खुलासा केला. शिवाय या मुलाखतीदरम्यान त्याने त्याच्या कार्सबद्दल असलेल्या प्रेमाविषयी खुलासा केला. इतकंच नाही तर कारच्या नंबरसाठी त्याने लाखो रुपये खर्च केल्याचंही कबूल केलं आहे.
आणखी वाचा : रितेश-जिनिलीयाचा ‘तुझे मेरी कसम’ टीव्ही किंवा ओटीटीवर का बघायला मिळत नाही? जाणून घ्या
हनी सिंगकडे ऑडी R8 हि गाडी होती आणि त्या गाडीच्या नंबरसाठी त्याने तब्बल २८ लाख खर्च केले होते. याविषयी बोलताना तो म्हणाला, “माझ्याकडे ऑडी R8 ही गाडी होती, आणि तिचा नंबरही स्पेशल होता R8. महाराष्ट्र आरटीओमधून तो खास नंबर मी विकत घेतला होता. नंतर मात्र मी आजारी पडलो तेव्हा मी सगळ्या गाड्या विकून टाकल्या. मी गाडी चालवूच शकत नव्हतो, आता मला इच्छाही नाही.”
मुलाखतीत हनी सिंगने त्याच्या मानसिक आजार आणि वेदनादायी संघर्षावर भाष्य केलं आहे. इंडस्ट्रीमध्ये पुन्हा पाऊल ठेवल्यावर हनी सिंगने स्वतःमध्येसुद्धा बरेच बदल केले आहेत. मानसिक आजारादरम्यान हनी सिंगने अत्यंत कठीण प्रसंगांना तोंड दिलं आहे. याविषयी खुलासा करताना प्रत्येक दिवशी तो स्वतःच्या मृत्यूची वाट पाहायचा असं त्याने सांगितलं आहे. हा काळ त्याच्यासाठी प्रचंड खडतर होता.