बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असलेले अनेक कलाकार इंडस्ट्रीतून अचानक गायब झाले. प्रत्येकांची इंडस्ट्रीतून फारकत घेण्याची कारणं वेगळी होती. अशाच एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने साध्वी बनण्यासाठी चित्रपटसृष्टी सोडली होती. त्या अभिनेत्रीचं नाव नीता मेहता होतं. नीता मेहता ७०-८० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांना अभिनेते संजीव कपूर यांच्याशी लग्न करायचं होतं.
‘तो’ एक किसिंग सीन अन् अभिषेक-राणीचं नातं तुटलं; अमिताभ बच्चन यांची सून होता होता राहिलेली अभिनेत्री
‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, नीता मेहता यांचा जन्म १९५६ मध्ये एका गुजराती कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील वकील होते, तर आई डॉक्टर होती. कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी संबंध नव्हता, पण नीता यांना अभिनेत्री व्हायचं होतं, तेच त्यांचं स्वप्न होतं. त्यांना अभ्यासात अजिबात रस नव्हता. त्यांना अभिनयाचं इतकं वेड होतं की त्यासाठी कुटुंबाचा विरोधही त्यांनी पत्करला.
नीता मेहता यांनी मुंबईतील एका शाळेत शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. इथून दोन वर्षांचा कोर्स केल्यानंतर नीता मेहता यांना चित्रपटांमध्ये अगदी सहज ब्रेक मिळाला. १९७५ मध्ये आलेला ‘पोंगा पंडित’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात नीता मेहतांबरोबर रणधीर कपूर होते. यानंतर नीता मेहता यांनी ‘ईंट का जवाब पत्थर’, ‘मंगल पांडे’, ‘ये है जिंदगी’, ‘आखरी इंसाफ’, ‘कमचोर’, ‘रिश्ता कागज का’, ‘जानी दुश्मन’, ‘हीरो’ आणि ‘सल्तनत’ असे अनेक चित्रपट केले.
नीता मेहता यांनी संजीव कुमारसोबत चार-पाच चित्रपट केले. एकत्र काम करत असताना नीता मेहता आणि संजीव कुमार एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनाही लग्न करायचे होते. पण संजीव कुमारच्या एका अटीने सर्व काही बिघडले. नीता मेहता यांनी लग्नानंतर चित्रपटात काम करू नये, अशी संजीव कुमार यांची इच्छा होती, असं म्हटलं जातं. मात्र नीता मेहता यांना हे मान्य नव्हते. पण नीतांनी ती अट मान्य केली नाही आणि त्यांचं लग्नही होऊ शकलं नाही. हळूहळू नीता यांना चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका मिळणे बंद झाले. त्यानंतर त्यांनी सहाय्यक भूमिका साकारण्यास सुरुवात केली. नीता मेहता काही चित्रपटांत मोठ्या बहिणीच्या, तर काही चित्रपटांत नायकाच्या वहिनीच्या भूमिकेत दिसू लागल्या. नीता मेहता यांनी जवळपास ४० चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. पण नंतर एक वेळ आली जेव्हा नीता मेहता यांना सहाय्यक भूमिकाही मिळत नव्हत्या. त्यानंतर नीता मेहता यांनी चित्रपटात काम करायचं सोडलं आणि दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला.
Video: अलाना पांडेच्या लग्नात भटजीने नवरदेव आयव्हरचं नाव चुकवलं; नवीन नाव ऐकून उपस्थितांना हसू अनावर
नीता मेहता यांचा हा दागिन्यांचा व्यवसाय चांगला चालला होता. त्यांनी त्यातून चांगली कमाई केली, पण अचानक त्यांनी सर्वकाही सोडलं आणि त्या साध्वी बनल्या. एवढंच नाही तर नीता मेहता यांनी आपले नावही बदलले. आता त्यांचे नाव स्वामी नित्यानंद गिरी आहे. त्यांचे एक युट्यूब चॅनल आहे, तिथे त्या आयुष्यातील त्यांचे अनुभव शेअर करत असतात. नीता मेहता यांनी त्या स्वामी नित्यानंद गिरी कशा बनल्या हेही एका व्हिडीओत सांगितलं होतं. त्या त्यांच्या गुरु माँ आनंदमयी यांच्यामुळे साध्वी बनल्या आणि त्यांच्यावर एक पुस्तकही लिहिलं आहे. नीता यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना साध्वी बनण्यासाठी ३०-४० वर्षे लागली. नीता मेहता यांचे कुटुंबही गुरु माँ आनंदमयी यांचे अनुयायी होते. त्यामुळे त्यांच्यावरही या गुरूंचा प्रभाव होता.