Karan Johar Slams General Dyer’s Kin Over Looters Remark : अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘केसरी 2’ लवकरच रिलीज होणार आहे. अक्षय ‘केसरी 2’ मध्ये सी शंकरन नायर या वकिलाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट अमृतसरमधील जालियनवाला बाग हत्याकांडात १६०० हून जास्त लोक मृत्यूमुखी पडल्यानंतर ब्रिटीशांविरोधात खटला भरणाऱ्या वकिलावर आधारित आहे. दरम्यान, याठिकाणी निष्पाप लोकांवर गोळ्या झाडणाऱ्या जनरल रेजिनाल्ड डायरच्या पणतीने जालियनवाला बाग हत्याकांडातील पीडितांबद्दल केलेल्या वक्तव्यावर अक्षय कुमार व चित्रपटाचा निर्माता करण जोहर यांनी संताप व्यक्त केला आहे.

“सी शंकरन नायर यांची यांची ही कथा ‘द केस दॅट शूक द एम्पायर’ या पुस्तकावर आधारित आहे. आपल्याला या हत्याकांडाबद्दल माहीत आहे, पण सत्य आपल्यापैकी कोणालाच माहीत नाही. त्या भयंकर घटनेचा उल्लेख झाल्यावर आपल्याला दुःख होतं, आपल्याला राग येतो. आपला संताप अनावर होतो, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ब्रिटीशांनी आजपर्यंत माफी मागितलेली नाही. आपण मोठ्या हिमतीने एक देश म्हणून ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो असलो तरी, एक राष्ट्र म्हणून त्यांनी आपली माफी मागायलाच हवी आणि हा चित्रपट त्यावरच आधारित आहे,” असं करण जोहर म्हणाला.

काय म्हणाली जनरल डायरची पणती?

जनरल डायरची पणती कॅरोलीन एका मुलाखतीत तिच्या पणजोबाने केलेल्या कृत्याचा बचाव केला होता. “एक आदरणीय माणूस, जो भारतीयांना खूप आवडतो” असं ती म्हणाली होती. तसेच तिच्या पणजोबांना अनेक भारतीय भाषा बोलता यायच्या असंही तिने म्हटलं होतं. एका पीडित कुटुंबातील सदस्याशी बोलताना तिने विचारले, “ते लुटारू होते का? मला वाटतं इतिहास हा इतिहास आहे आणि तुम्हाला तो स्वीकारावं लागेल.” न्यूज १८ ने हे वृत्त दिलंय.

करण जोहरची प्रतिक्रिया

करणने तिच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. “मी तो व्हिडीओ पाहिला आहे. फक्त एक भारतीय म्हणून किंवा माणुसकीच्या दृष्टीकोनातून मी तिच्या वक्तव्याकडे पाहत नाही; तर ज्यांच्या मनात थोडी तरी सहानुभूती आहे आणि माणुसकी आहे त्या व्यक्तीला तिच्या या वक्तव्याचा नक्कीच राग येईल. त्या हजारो लोकांना लुटारू म्हणायची तिची हिंमतच कशी झाली? ते सगळे निष्पाप लोक होते, जे बैसाखीच्या दिवशी एकत्र जमले होते. जनरल डायरने स्वतःच सांगितलं होतं की जेव्हा गोळ्या संपल्या तेव्हाच त्याने गोळ्या झाडणं थांबवलं होतं,” असं करण म्हणाला.

ती वेगळ्याच विश्वात जगतेय – करण जोहर

“तुमचं काम द्वेष करणं असेल तर मनात प्रेम कसं असेल? ती स्वतःच्या वेगळ्यात विश्वात आणि भ्रमात जगतेय… ती जे बोलली ते ऐकून माझं रक्त खवळलंय. मी तिला ओळखत नाही, तिला कधी भेटलो नाहीये आणि भेटायचंही नाही. तिने जे विधान केलं ते ऐकल्यावर राग जेतो. मी तिचा व्हिडीओ पाहिल्यावर मला वाटलं की तिच्या मनात जगातील सर्वात मोठ्या नरसंहारापैकी एक असलेल्या या घटनेबद्दल किती द्वेष आहे,” असं करण संतापून म्हणाला.

अक्षय कुमार म्हणाला…

अक्षय कुमारही याबद्दल व्यक्त झाला. “एका देशाने जे आघात सहन केले, तो दुसऱ्या देशासाठी धडा असतो. हे तिला कधीच समजलं नाही आणि इतिहास हाच इतिहास आहे म्हणतेय. करण जे बोलला आणि ज्या पद्धतीने बोलला त्याचं मला कौतुक वाटतंय,” असं अक्षय म्हणाला.

‘केसरी 2’ १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारबरोबर अनन्या पांडे, आर माधवन, स्टिव्हन हार्टली हे कलाकार आहेत.