Sonali Kulkarni Birthday Special: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही एक हरहुन्नरी आणि गुणी अभिनेत्री आहे. तिने आत्तापर्यंत विविध भाषांमधल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच नाटक आणि एकांकीका यामध्येही तिने काम केलं आहे. ‘दिल चाहता है’, ‘मिशन कश्मीर’ या चित्रपटांमधल्या तिच्या भूमिका आजही पाहिल्या की तिचा सहज सुंदर अभिनय कळतो. मराठीतही सोनालीने ‘दोघी’, ‘मुक्ता’ या सारख्या चित्रपटांपासून गुलाबजाम, तिचं शहर होत जाणं अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. याच सोनालीचा आज वाढदिवस त्या निमित्ताने जाणून घेऊ तिला पहिला सिनेमा कसा आणि कुणामुळे मिळाला?

पी.टी. उषा किंवा किरण बेदी व्हायचं होतं

सोनाली कुलकर्णीला अभिनेत्री व्हायचं हे स्वप्न सुरुवातीपासून नव्हतं. तिच्या समोर आदर्श होत्या पी. टी. उषा आणि किरण बेदी. अभ्यास करुन मोठं होऊन आपल्याला यांच्यासारखं व्हायचं आहे असं तिने ठरवलं होतं. महाविद्यालयात आल्यानंतर ती अभिनयाकडे वळली. त्याआधी पुण्यातल्या तिच्या सोसायटीत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये, छोट्या नाटकांमध्ये ती अभिनय करत असे. सोनाली कुलकर्णीचा मोठा भाऊ संदीप कुलकर्णी याचा तिच्या आयुष्यावर प्रभाव आहे हे तिनेच सांगितलं होतं. शाळेतही नाट्यवाचन स्पर्धेत ती भाग घ्यायची. मात्र महाविद्यालयात आल्यानंतर आणि सत्यदेव दुबेंचं नाटकाचं वर्कशॉप अटेंड केल्यानंतर ती अभिनयाकडे वळली. आई बाबांकडून मला सच्चेपणा मिळाला. जे आवडतं ते सगळं केलंच पाहिजे हा नियम आमच्या घरात होता आणि त्याबरोबरच अभ्यासही केला पाहिजे असाही दंडक होता असंही सोनालीने सांगितलं होतं.

Mamta Kulkarni Laxmi Narayan Tripathi Expelled By Kinnar Akhara Founder
ममता कुलकर्णीची एका आठवड्यात किन्नर आखाड्यातून हकालपट्टी, महामंडलेश्वर पददेखील गेलं, नेमकं काय घडलं?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
mrinal kulkarni writes special post for mother in law
करिअर, विराजसची जबाबदारी…; मृणाल कुलकर्णींना सासूबाईंनी दिली भक्कम साथ, त्यांच्या ९० व्या वाढदिवशी अभिनेत्रीची खास पोस्ट
amit bhanushali birthday on set villain priya new look grabs attention
Video : ‘ठरलं तर मग’च्या सेटवर अर्जुनच्या वाढदिवसाची धमाल! खलनायिका प्रियाच्या नव्या लूकने वेधलं लक्ष, मिळाली मोठी हिंट
Rupali Bhosale
“यशाच्या शिड्या जिच्या जीवावर…”, ‘आई कुठे काय करते’फेम रुपाली भोसलेने दिल्या आईला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; म्हणाली, “मी कायम…”
mamta kulkarni marathi bramhan family
मराठी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, ती ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींची आहे नातेवाईक
mamta kulkarni took sanyas
२५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी पोहोचली महाकुंभमध्ये, अभिनेत्री होणार ‘या’ आखाड्याची महामंडलेश्वर
mrinal kulkarni writes special post for husband ruchir kulkarni
मृणाल कुलकर्णींच्या पतीला पाहिलंत का? ‘सोनपरी’ने नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त लिहिली सुंदर पोस्ट, म्हणाल्या…
Sonali Kulkarni
सोनाली कुलकर्णी बर्थडे स्पेशल (फोटो सौजन्य-फेसबुक)

सत्यदेव दुबे आयुष्यात आले आणि..

मी अकरावीत होते तेव्हा माझ्या आयुष्यात सत्यदेव दुबे आले. दुबेजीचं पुण्यात वर्कशॉप झालं आणि ती खूप महत्त्वाची गोष्ट ठरली. पुरुषोत्तम करंडक, फिरोदियामध्ये भाग घ्यायचा हे मी ठरवलं होतं. पण सत्यदेव दुबेंनी आम्हा तरुणांना त्यावेळी सांगितलं की स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी अभिनय करायचा नसतो. त्याच्या पलिकडेही नाटक असतं. त्यावेळी ते माझ्या ध्यानीमनी नव्हतं. आधी वाटायचं की खूप चिडून दाखवलं की मी चांगला अभिनय करते. डोळ्यातून पाणी आलं की मी चांगला अभिनय करते. मला कॉलेजमधून रिजेक्ट केलं गेलं होतं. तू खूप ओव्हर अॅक्टिंग करतेस असं मला सांगितलं होतं. मात्र सत्यदेव दुबेंनी नाटकाचं जग दाखवलं. आपण जन्माला जे रंग रुप घेऊन येतो त्याच्या पलिकडेही महत्त्वाची आपली वृत्ती असे आणि कलाकार म्हणून ती निर्माण करायची असते हा विचार सत्यदेव दुबेंनी दिला. असं सोनाली कुलकर्णीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

गिरीश कर्नाड यांच्यामुळे कसा मिळाला पहिला सिनेमा?

सोनालीने याविषयीही सांगितलं आहे. ती म्हणते, “मी फर्स्ट इयरला होते आणि मला गिरीश कर्नाड यांचा ‘चेलुवी’ नावाचा सिनेमा मिळाला. मात्र तो सिनेमा अचानक मिळाला नाही. गिरीश कर्नाड यांना चेलुवीच्या भूमिकेसाठी एका अभिनेत्रीचा शोध होता. विविध ऑडिशन्स घेत होते. बंगळुरु, दिल्ली, हैदराबाद प्रमाणेच ते पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर सत्यदेव दुबे त्यांना म्हटलं होतं की इथेही काही मुली थिएटरमध्ये काम करतात, त्यांचं कामही तुम्ही पाहा. सत्यदेव दुबेंनी ज्या १० ते १५ मुलींबाबत सुचवलं होतं त्यातली एक मी होते. त्यावेळी मला वाटलं की गिरीश कर्नाड हे काही निवडणार नाही. आपण चहा पोहे त्यांना देऊ, गिरीश कर्नाडांशी बोलण्याची संधी मिळाली तर बोलू असं मी ठरवलं होतं. पण गिरीश कर्नाड जेव्हा नातू यांच्या घरी आले तेव्हा त्यांनी मला माझं नाव विचारलं, तू काय करतेस विचारलं? त्यावेळी मी खानोलकरांचं एक नाटक करत होते मी ते त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले मी देखील खानोलकरांचं नाटक केलं आहे. तेव्हा मी पाहात राहिले की जिचं नावही माहीत नाही अशा मुलीशी म्हणजे माझ्याशी ते बोलत आहेत. माझ्याशी गिरीश कर्नाड बोलले याचाच मला आनंद झाला. माझी निवड त्या भूमिकेसाठी होईल असं वाटलंही नव्हतं.”

‘चेलुवी’ सिनेमाचा अनुभव कसा होता?

“‘चेलुवी’ सिनेमासाठी जे फोटोसेशन केलं गेलं त्यातून माझी निवड झाली. तसंच गिरीश कर्नाड यांनी ऑडिशन घेतली. पुढे काही कळलं नव्हतं. मी त्यावेळी अचानक स्टेप कट केला होता. घरातल्यांना सरप्राईज करेन असं वाटलं होतं. पण घरातले तर माझ्याशी बोललेही नाहीत. त्यावेळी गिरीश कर्नाड मला म्हणाले की तू केस का कापलेस? तू घरी कुणाला विचारलं की नाही? स्टेप कटचं फॅड म्हणून मी तो हेअरकट केला होता. पण गिरीश कर्नाड यांनी विचारल्यामुळे मला जाणीव झाली की आपल्याकडे जे फॅड येतं त्याच्याकडे एक श्वास घेऊन पाहिलं पाहिजे. पण माझी निवड झाली.”

‘चेलुवी’ सिनेमाची झलक (सौजन्य-दूरदर्शन)

माझी निवड झाली तेव्हा माझ्या काकूच्या घरी फोन होता. त्यावेळी फोनवर गिरीश कर्नाड मला म्हणाले की सोनाली आमच्या या सिनेमात तू प्रमुख भूमिका करावीस अशी आमची इच्छा आहे. तुला ते आवडेल का? आम्ही तुला ब्रेक देतो आहे वगैरे अशी भाषा नव्हती. त्यांचा नम्रपणा मला खूप भावला. त्यावेळी मी त्यांना म्हटलं मला सिनेमात घेत आहात पण माझी डिसेंबरमध्ये परीक्षा आहे. त्यावर ते म्हणाले मी तुझ्या प्रिन्सिपलना पत्र लिहितो मग तर झालं? मी म्हटलं की हो मग चालेल… आणि अशा प्रकारे मला ‘चेलुवी’ सिनेमा मिळाला. असंही सोनाली कुलकर्णीने सांगितलं होतं.

‘चेलुवी’ सिनेमा कान फेस्टिव्हलमध्ये निवडला गेला होता. तसंच त्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यामुळे माझ्यासाठी खूप मोठं अवकाश खुलं झालं. सोनाली म्हणाली होती की मला माझ्या आयुष्यात खूप चांगले लेखक आणि दिग्दर्शक मिळाले. त्यामुळे मी शिकत गेले. ‘चेलुवी’ सिनेमा हे माझ्यासाठी वर्कशॉपच होतं.

प्रयोगशील अभिनेत्री म्हणून लौकिक

सोनालीने आत्तापर्यंत गुजराती, कन्नड, तमीळ, तेलगू अशा भाषांमध्येही काम केलं आहे. मणिरत्नम, व्ही बालू, दिग्विजय सिंग, जब्बार पटेल, गुरींदर चढ्ढा, रमेश सिप्पी यांच्यासह अनेक दिग्दर्शकांसह काम केलं. सुमित्रा भावे आणि सुनील सुखथनकर यांच्या ‘दोघी’, ‘देवराई’ या सिनेमांमध्येही तिने उत्तम अभिनय केला आहे. ‘दोघी’ या तिच्या सिनेमाचा हिंदीत रिमेकही झाला होता. राणी मुखर्जी आणि कोंकणा सेन शर्मा यांचा ‘लागा चुनरी में दाग’ हा सिनेमा त्यावर बेतलेला होता. १९९२ ते २०२३ अशी प्रदीर्घ कारकीर्द सोनालीची आहे. तिचा अभिनय हा सहज सुंदर आहे. भूमिकेशी एकरुप होणं हे तिला खूप चांगल्या पद्धतीने जमलं आहे. त्यामुळेच तिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं असं एक स्थान निर्माण केलं आहे. ‘व्हाईट लिली आणि नाईट रायडर’ या नाटकाचे प्रयोगही सोनाली करते. सिनेमा, मालिका, वेब सीरिज या सगळ्या माध्यमांमध्ये ती झळकत असली तरीही ती रंगमंच विसरलेली नाही. तसंच तिने अभिनेत्याबरोबर झाडामागे बागडत फिरणारी अभिनेत्री साकारली नाही. तर आपल्या अभिनयाचे सगळे रंग तिने विविध भूमिकांमधून भरले. ‘देऊळ’, ‘दायरा’, ‘कैरी’, ‘घराबाहेर’, ‘सखी’, ‘रिंगा रिंगा’ पासून ‘गुलाबजाम’, ‘अगं बाई अरेच्चा २’ अशी कितीतरी नावं घेता येतील. त्यातल्या भूमिकांमध्ये ती वेगळेपण जपत आली आहे. म्हणूनच एक प्रयोगशील अभिनेत्री म्हणून तिचा लौकिक कायम आहे.

आंबेडकर सिनेमात रमाबाई आंबेडकरांच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी

‘.. आणि काशीनाथ घाणेकर’ सिनेमात सोनालीने साकारलेली सुलोचना लाटकर यांची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती. त्याचप्रमाणे ‘प्रकाश बाबा आमटे’ सिनेमात तिने साकारलेली मंदाकिनी आमटे यांचीही भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या भूमिकेसाठी तिच्या हातात खूप कमी वेळ होता. तरीही तिने त्या भूमिकेचा अभ्यास करुन आणि मंदाकिनी आमटेंचं निरीक्षण करुन ती भूमिका साकारली. तसंच ‘आंबेडकर’ या सिनेमात तिने रमाबाईंचीही भूमिका साकारली आहे. अशा वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी तिचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. अशा या कल्पक आणि हरहुन्नरी अभिनेत्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Story img Loader