विकी कौशल आणि त्याचे पंजाबी गाण्यावर असलेले प्रेम कोणापासूनही लपून राहिलेले नाही. आता तो ‘बॅड न्यूज’ चित्रपटामुळे मोठ्या चर्चेत आला आहे. नुकतेच त्याचे तौबा तौबा हे गाणे प्रदर्शित झाले असून, विकीच्या डान्सचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे. सोशल मीडियावर विकीच्या ‘तौबा तौबा’ गाण्याची जादू पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे डान्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या हृतिक रोशननेदेखील विकी कौशल आणि तृप्ती डिमरीचे कौतुक केले आहे.
बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या डान्सच्या कौशल्यासाठी ओळखला जातो. त्याला अनेकदा ग्रीक देवता, असेही संबोधले जाते. सोशल मीडियावर विकीने ‘तौबा तौबा’ गाणे शेअर केलेल्या पोस्टवर हृतिक रोशनने, “खूप सुंदर, तुझी शैली आवडली”, असे म्हटले आहे. आता हृतिकने कौतुक केल्यावर विकीला खूप आनंद झाल्याचे पाहायला मिळाले. हृतिकने केलेल्या कमेटचा स्क्रीनशॉट त्याने आपल्या स्टोरीवर शेअर केला आहे. हे करीत असताना विकीने म्हटले आहे की, ही रात्र मला म्हणत आहे, आयुष्य यशस्वी झाले. त्याबरोबरच त्याने आपली कृतज्ञता व्यक्त करताना पोस्टमध्ये हृदयाच्या इमोजीचासुद्धा वापर केला आहे.
हृतिकने दिलेली ही कौतुकाची थाप महत्त्वाची आहे. कारण- हृतिकची बॉलीवूडमधील उत्कृष्ट डान्स करणाऱ्या मोजक्या कलाकारांमध्ये गणना होते. त्याने दिलेल्या या पोचपावतीने फक्त विकीचा आत्मविश्वासच उंचावला नाही, तर गाणे उत्तम झाल्याची खात्री पटली आहे. हृतिकबरोबरच अभिनेत्री जान्हवी कपूरनेदेखील विकीचे कौतुक करीत, त्याने गाण्याला न्याय दिल्याचे म्हटले आहे. त्याबरोबरच पत्नी व बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफनेदेखील विकीला पाठिंबा दिल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहे.
‘तौबा तौबा’ गाण्यावर विकीचा डान्स पाहून नेटकऱ्यांना कतरिना कैफच्या ‘धूम ३’ चित्रपटातील ‘कमली’ गाणे आठवल्याचे पाहायला मिळाले होते. अनेकांनी विकीला घरीच डान्सची सर्वोत्तम शिक्षिका मिळाल्याचे म्हटले होते; तर अनेकांनी विकीला कधीच असे नाचताना पाहिले नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, विकीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटात कतरिना पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावताना दिसणार असल्याने खऱ्या आयुष्यातील या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. बॅड न्यूज या चित्रपटात विकी कौशलसह तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार असून, आनंद तिवारी हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहे. आता गाण्याला ज्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तसा प्रतिसाद चित्रपटाला मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.