बॉलीवूड स्टार हृतिक रोशन सध्या चर्चेत आहे. हृतिक क्वचितच आपलं परखड मत सोशल मीडियावर मांडत असतो. पण नुकतीच हृतिकनं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे; ज्यामध्ये त्यानं अ‍ॅपल कंपनीच्या आयपॅडच्या एका जाहिरातीवर टीका केली आहे. त्याच्या या पोस्टनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हृतिक रोशननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. अ‍ॅपलच्या ‘आयपॅड प्रो २०२४’ (iPad Pro 2024)च्या रीलिजच्या जाहिरातीवर त्यानं टीका केली आणि लिहिलं, “नवीन अ‍ॅपलची जाहिरात किती दुःखी आणि अज्ञानी आहे.”

अ‍ॅपल कंपनीचे सीईओ टिम कूक यांनी मंगळवारी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक जाहिरात शेअर केली होती. तेव्हापासून या जाहिरातीवर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. अ‍ॅपल कंपनीच्या ‘लेट लूज’ लॉंच इव्हेंटमध्ये नवीन आयपॅड्सचे अनावरण केल्यानंतर अनेक सेलिब्रिटी आणि कलाकारांसह जगभरातील हजारो लोकांनी या ‘क्रश’ नावाच्या जाहिरातीवर टीका केली.

हेही वाचा… ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो

हॉलीवूड अभिनेता ह्यू ग्रँट, लेखक व निर्माता आसिफ कपाडिया, चित्रपट निर्माते व अभिनेता जस्टिन बेटमन आणि इतर अनेकांसह आता हृतिक रोशननंदेखील या जाहिरातीवर टीका केली आहे.

हेही वाचा… गुड न्यूज दिल्यानंतर पहिल्यांदाच दिसला दीपिका पदुकोणचा बेबी बंप; अभिनेत्रीचा अनसीन फोटो व्हायरल

त्याचं झालं असं की, काही दिवसांपूर्वी अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक यांनी एक्स अकाउंटवर ही जाहिरात शेअर केली होती. ही जाहिरात शेअर करीत सीईओ टिम कूकनी लिहिलं होतं, “हा आम्ही तयार केलेले सर्वांत पातळ प्रॉडक्ट आहे. एम ४ चिपच्या अविश्वसनीय सामर्थ्यानं आम्ही आतापर्यंत उत्पादित केलेला सर्वांत प्रगत डिस्प्ले या प्रॉडक्टमध्ये आहे. फक्त कल्पना करा की, हे प्रॉडक्ट अजून किती गोष्टी तयार करू शकतं.”

या जाहिरातीबद्दल ॲपलने मागितली माफी

‘ॲड एज’च्या वृत्तानुसार, ॲपलने या जाहिरातीबद्दल माफी मागितली आहे आणि ही जाहिरात टेलिव्हिजनवर न चालविण्याचा निर्णय घेतला. ‘ऍड एज’ला जारी केलेल्या एका निवेदनात, ॲपल, मार्केटिंग कम्युनिकेशन्सचे व्हीपी (VP) टोर मायरेन म्हणाले, “आमच्या डीएनएमध्ये क्रिएटिव्हीटी आहे. जगभरातील क्रिएटिव्हजना सक्षम करणारे प्रॉडक्ट्स डिझाइन करणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वापरकर्त्यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी असंख्य मार्ग असले पाहिजेत आणि आयपॅडद्वारे त्यांच्या या मार्गांना, कल्पनांना आम्ही सत्यात उतरवू पाहतो. ते आमचं नेहमीच ध्येय राहिलं आहे. या व्हिडीओमुळे आम्ही जे दाखविण्याचा प्रयत्न करीत होतो, त्याचा मार्ग चुकला आणि त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.”

तथापि, एक्स अकाउंटवर टिम कूकची ही पोस्ट अजूनही आहे आणि ही जाहिरात अद्याप ॲपलच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर आहे.