हृतिक रोशन व दीपिका पदुकोणचा फायटर चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. प्रेक्षकांकडून या ट्रेलरला मोठा प्रतिसाद मिळाला. एवढंच नाहीतर या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांना वेड लावले आहे. उद्या म्हणजेच (२५ जानेवारीला) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शनाच्या एक दिवस अगोदर ‘फायटर’च्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे.
एकीकडे भारतीय प्रेक्षकांमध्ये ‘फायटर’ चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे तर दुसरीकडे आखाती देशांमध्ये (Gulf Countries) या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. UAE वगळता सर्व आखाती देशांमध्ये ‘फाइटर’ प्रदर्शित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अद्याप या बंदीमागचे कारण समोर आलेले नाही. चित्रपट व्यवसाय तज्ञ आणि निर्माता गिरीश जोहर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. अखाती देशात घालण्यात आलेल्या या बंदीमुळे ‘फायटर’ चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. या बंदीचा चित्रपटाच्या कमाईवर मोठा परिणाम होणार आहे.
दरम्यान सीबीएफ (सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म) ने ‘फायटर’मधील काही डायलॉग आणि सीन्सवर कात्री लावली आहे. सीबीएफच्या सूचनेनुसार चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. चित्रपटातील काही आक्षेपार्ह शब्द काढून टाकण्यास किंवा त्यांना म्यूट करण्याचे आदेश सीबीएफकडून देण्यात आले आहेत. तसेच चित्रपटातील सेक्युअल सजेस्टेंड विज्युअल्स हटवण्याचीही सूचना करण्यात आली आहे. चित्रपटातील धूम्रपान विरोधातील संदेश हिंदीत दाखवा असेही सांगण्यात आले आहे.
हेही वाचा- हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटाच्या ट्रेलरची शाहरुख खानला भुरळ; म्हणाला, “खलनायकाचा लूक अन्…”
प्रदर्शनाअगोदरच फायटरने भारतात अगाऊ बुकिंगमधून मोठी कमाई केली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाची ८६ हजार ५१६ तिकीटांची विक्री झाली असून यातून चित्रपटाने २.८४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे सर्वाधिक आगाऊ तिकीट बुकिंग महाराष्ट्रात झाले आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, तलत अजीज यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.