आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. केवळ भेटच नाही तर त्यांच्याबरोबर काही क्षण एन्जॉय करण्यासाठी किंवा किमान एक फोटो तरी मिळावा यासाठी उतावीळ असतात. शिवाय काही कलाकारही चाहत्यांचे प्रेम समजून त्यांना भेटण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. अशाच काही कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता हृतिक रोशन. बॉलीवूडमधील काही लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan).

आपल्या अभिनय व नृत्याने चर्चेत राहणारा हा अभिनेता त्याच्या चाहत्यांवरील प्रेमासाठीही तितकाच ओळखला जातो. तो आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी कायमच उत्सुक असतो. यासाठी तो कार्यक्रमाचे आयोजनही करत असतो. हृतिक रोशन सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे. शनिवारी, ५ एप्रिल रोजी टेक्सासमधील डॅलास येथे चाहत्यांसाठी आयोजित कार्यक्रमात तो उपस्थित होता. मात्र, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या चाहत्यांची निराशा झाल्याचे समोर येत आहे.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या चाहत्यांनीच याबद्दल सांगितलं आहे. चाहत्यांनी आयोजकांवर खराब व्यवस्थापनाचा आरोप केला आणि सोशल मीडियावर या कार्यक्रमाबद्दल तक्रार केली. या कार्यक्रमातील अभिनेत्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे समोर येत आहेत, जिथे नाराज झालेले चाहते निराशा व्यक्त करताना दिसत आहेत. हृतिक रोशनच्या चाहत्यांच्या भेटीच्या कार्यक्रमाचे आयोजन अभिनेत्री सोफी चौधरीने केले होते.

या कार्यक्रमातील सहभागी एका चाहत्याने दावा केला की, त्याने अभिनेत्याला भेटण्यासाठी तब्बल १,२८,००० रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च केले. इतके पैसे देऊनही त्याची हृतिकशी भेट होऊ शकली नाही. याबद्दल त्याने रेडिटवर पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. या पोस्टमधून चाहत्याने कार्यक्रमाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय कार्यक्रमाच्या चुकीच्या व्यवस्थापनाबद्दलही भाष्य केलं आहे

या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “ऋतिक रोशनला भेटण्यासाठी $१५०० पेक्षा जास्त (१,२८,००० रुपयांपेक्षा जास्त) खर्च केले आणि मला एकही फोटो मिळाला नाही. अनेक लोक हृतिकला भेटण्यासाठी रांगेत उभे राहूनही फोटो काढण्यास उत्सुक होते, पण त्यांना भेट नाकारण्यात आली. इतके पैसे खर्च करूनही आम्हाला परत पाठवण्यात आले. आम्हाला दोन तास रांगेत उभे राहावे लागले. ऋतिकवर प्रेम आहे, पण कार्यक्रमाच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे तोही चिडला.”

त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, काही मुले हृतिक रोशनबरोबर स्टेजवर परफॉर्म करण्यास उत्सुक होती, पण त्यांना दूर ढकलण्यात आले. या सर्व प्रकरणी अद्याप हृतिकने स्वत: काही भाष्य केलेलं नाही. दरम्यान, अमेरिका दौऱ्यादरम्यान हृतिक रोशन अटलांटा, ह्युस्टन, न्यू जर्सी आणि शिकागोसारख्या अनेक शहरांना भेट देणार आहे.