बॉलीवूडमधील सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक लोकप्रिय अभिनेता म्हणजे हृतिक रोशन (Hrithik Roshan). आतापर्यंत हृतिकने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. बॉलीवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणूनही त्याला ओळखले जाते. ‘क्रिश’, ‘वॉर’यांसारख्या अनेक अॅक्शन चित्रपटांमधील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. अभिनेता म्हणून आजवर आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हृतिक आता लवकरच दिग्दर्शक म्हणून भेटीला येणार आहे.
हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी स्वत: याविषयी सांगितलं आहे. आदित्य चोप्रा यांच्याबरोबर मिळून ते ‘क्रिश ४’ ची निर्मिती करणार आहेत. पुढच्या वर्षी २०२६ च्या सुरुवातीला या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशन ‘क्रिश ४’ मध्ये तो दिग्दर्शकाची भूमिकाही साकारणार आहे.
याबद्दल राकेश रोशन यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर लेकाबरोबरचा खास फोटो शेअर केला आहे आणि असं म्हटलं आहे की, “डुग्गू २५ वर्षांपूर्वी मी तुला अभिनेता म्हणून लाँच केले होते आणि आज पुन्हा २५ वर्षांनंतर मी तुला दिग्दर्शक म्हणून लाँच करत आहोत. जेणेकरून मी आदित्य चोप्राबरोबरचा सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपट पुढे नेऊ शकेन. याबद्दल तुला आशीर्वाद आणि यश मिळो या शुभेच्छा.”
राकेश रोशन यांना या गोष्टीचा आनंद आहे की, आदित्य चोप्रा ‘क्रिश ४’ चे निर्माते आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले, “आदित्य आणि यशराज फिल्म्स हे ‘क्रिश ४’ च्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. आदित्यनंच हृतिकला दिग्दर्शक बनवण्याचा निर्णय घेतला. आदित्य आणि हृतिकची निर्माता-दिग्दर्शक जोडी एक अफलातून आणि अप्रतिम असेल.”
दरम्यान, ‘क्रिश’ चित्रपट भारतातील लोकप्रिय सुपरहीरो फ्रँचायझी आहे. याची सुरुवात ही २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटानं झाली होती. त्यानंतर २००६ मध्ये ‘क्रिश’ आणि २०१३ मध्ये आलेल्या ‘क्रिश ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. त्यानंतर आता ‘क्रिश ४’ची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
त्याचबरोबर आजवर अभिनेता म्हणून चाहत्यांच्या भेटीला आलेल्या हृतिक रोशनलाही त्याच्या नवीन दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते मंडळी चांगलेच उत्सुक आहेत. मात्र हृतिकने दिग्दर्शित केलेल्या ‘क्रिश ४’साठी त्याच्या चाहत्यांना २०२६ पर्यंत वाट पहावी लागणार आहे.