बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा सध्याच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. त्याचा याचवर्षी प्रदर्शित झालेला ‘विक्रम वेधा’ फारसा चालला नसला तरी प्रेक्षकांनी हृतिकच्या कामाचं कौतुक केलं. नुकतंच हृतिकने एका मुलाखतीमध्ये त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. प्रथम मुलाला लॉंच करायच्या विरोधात असणारे राकेश रोशन यांनी हृतिकला ब्रेक का दिला याचा खुलासा खुद्द हृतिकने केला आहे.
‘गलाट्टा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटात भूमिका कशी मिळाली याविषयी खुद्द हृतिकने खुलासा केला आहे. राकेश रोशन यांना हृतिकसाठी चित्रपट काढायचाच नव्हता. याविषयी त्यांनी हृतिकला बऱ्याचदा सांगितलं होतं. हृतिक या मुलाखतीत म्हणाला, “माझे वडील मला पदोपदी सांगायचे की मी तुझ्यासाठी चित्रपट काढणार नाही. जे काही करायचं आहे ते तुला स्वतःच्या बळावर करायचं आहे. मी तेव्हा ऑडिशन आणि स्क्रीन टेस्ट द्यायचो, त्यासाठी मी माझं फोटोशूट करून घेतलं होतं, माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते, पण मित्र डबू रत्नानीकडून मी शूट करून घेतलं आणि त्याला जेव्हा मी पैसे मिळवायला लागेन तेव्हा परत करेन असं कबूलही केलं होतं.”
जेव्हा राकेश रोशन ‘कहो ना प्यार है’च्या कथेवर काम करत होते, तेव्हा त्यांच्याबरोबरच इतरही लेखक जोडले गेले होते. त्यावेळी या चित्रपटासाठी शाहरुख खानचा विचार सुरू होता. याविषयी सांगताना हृतिक म्हणाला, “त्यावेळेस मीदेखील त्या प्रोजेक्टचा एक भाग होतो. तेव्हा चर्चा करताना सगळ्यांचं म्हणणं पडलं की या चित्रपटासाठी एखादा नवा चेहेरा घेणंच उत्तम ठरेल. सगळ्यांचं म्हणणं तेच होतं तेव्हा मीसुद्धा धाडस करून वडिलांना सांगितलं, की हो, हा चित्रपट शाहरुखने करावा असं मलाही वाटत नाही.”
सगळ्यांच्याच म्हणण्यावर विश्वास ठेवून अखेर राकेश रोशन यांनी हृतिक रोशनला या चित्रपटात घायाचं ठरवलं आणि पुढे या चित्रपटाने इतिहास रचला. हृतिक रोशन आणि अमीषा पटेल दोघेही रातोरात सुपरस्टार झाले आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेकिंग कमाई केली.