शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे बऱ्याच लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. यावरून बऱ्याच लोकांनी त्यांची मतं मांडली आहेत. कित्येक ठिकाणी शाहरुख आणि दीपिका विरोधात आंदोलन केलं जात आहे तर काही ठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात येत आहेत.
एकीकडे राजकीय आणि धार्मिक संघटना या गाण्याचा आणि चित्रपटाचा विरोध करत आहेत तर बॉलिवूडकर या चित्रपटाच्या आणि शाहरुखच्या पाठीशी उभे राहिले आहेत. कित्येक बॉलिवूड कलाकारांनी हा मुद्दा कसा चुकीचा आहे हे नमूद केलं आहे. पायल रोहतगीपासून सूचित्रा कृष्णमूर्तिपर्यंत कित्येक कलाकारांनी शाहरुखची बाजू घेत या विरोधाला प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे.
आणखी वाचा : “मी लग्न करेन पण त्याआधी…” सुपरस्टार प्रभासने मुलाखतीदरम्यान केला मोठा खुलासा
यामध्ये आता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादनेसुद्धा एन्ट्री घेतली आहे. सबाने या चित्रपटाला समर्थन दर्शवत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे, आणि ती चांगलीच व्हायरल झाली आहे. शाहरुख आणि दीपिकाचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “मी पठाण चित्रपटगृहात एकदा नव्हे तर दोनवेळा पाहणार आहे.” सबाच्या या पोस्टमुळे शाहरुखचे चाहतेदेखील खुश झाले आहेत.
गेली काही वर्षं चाहते शाहरुखच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. या गाण्यामुळे निर्माण झालेल्या वादामुळे हा चित्रपटसुद्धा बॉयकॉट करावा अशी मागणी होताना दिसत आहे. ‘पठाण’ २५ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात धडकणार आहे. शाहरुखसह दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम यांची यात महत्त्वाची भूमिका आहे.