बॉलिवूडच्या किंग खानला ‘पठाण’मधून दमदारमधून कमबॅक करून देणारा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हा त्याच्या आगामी ‘फायटर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. २५ जानेवारी २०२४ रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदूकोण व अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका व हृतिक ही जोडी प्रथमच पडद्यावर दिसणार आहे.
चित्रपटातील त्यांच्यातील केमिस्ट्रीची जबरदस्त चर्चा होत आहे. नुकताच या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटदरम्यान हृतिक रोशनने अनिल कपूर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं जे ऐकून अनिल कपूर यांच्या डोळ्यात पाणी आलं. नुकतंच मीडियाशी संवाद साधताना हृतिकने अनिल कपूर यांच्या कामाची प्रशंसा केली, इतकंच नव्हे तर त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
आणखी वाचा : रामलल्लाचे दर्शन न मिळाल्याबद्दल अरुण गोविल यांनी व्यक्त केली खंत; म्हणाले, “स्वप्न पूर्ण झालं, पण…”
हृतिकने त्याचे वडील राकेश रोशन यांच्या बऱ्याच चित्रपटात सहाय्यक म्हणून काम केलं आहे. त्यापैकी ‘खेल’ आणि ‘कारोबार’ या चित्रपटात अनिल कपूर होते अन् त्यावेळी एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून हृतिकला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. त्याचीच आठवण हृतिकने काढली. तो म्हणाला, “मी अनिल सरांना सेटवर पाहतच मोठा झालो आहे. फायटरच्या वेळी चित्रीकरण करताना पुन्हा तोच जुना काळ डोळ्यासमोर उभा राहीला.”
पुढे हृतिक म्हणाला, “एक सहाय्यक म्हणून काम करताना अनिल सरांना पाहून त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी मला पुन्हा नव्याने शिकता आल्या. माझ्यासाठी ते एक प्रेरणास्थानच आहेत. आज जो हृतिक तुमच्यासमोर आहे त्यात अनिल कपूर यांचादेखील खारीचा वाटा आहे. गेली चार दशकं मेहनत घेऊन आजही कित्येक नव्या गोष्टी करण्याची ताकद त्यांच्यात आहे.” हृतिकचे हे शब्द ऐकून अनिल कपूर यांना अश्रु अनावर झाले अन् ते भावुक झाल्याचं आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो. पुढे हृतिक म्हणाला, “तुम्ही अभिनय कार्यशाळांचे एक प्रतीक असायला हवे. त्यांनी तुम्हाला तसेच सादर करायला हवे.”