बॉलीवूडचा हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृतिक रोशनच्या ‘लक्ष्य’ चित्रपटाला आज २० वर्षे पूर्ण झाली आहेत. १८ जून २००४ला प्रदर्शित झालेल्या ‘लक्ष्य’ चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटातील ‘मैं ऐसा क्यू हूं’, ‘अगर मैं कहूं’, ‘लक्ष्य’, ‘कंधों से मिलते हैं कंधे’ ही गाणी सुपरहिट झाली होती. अजूनही हृतिक रोशनचा ‘लक्ष्य’ चित्रपट आणि त्यातील गाणी तितक्यात आवडीने पाहिली जातात. आज या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित ‘लक्ष्य’ चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.
‘लक्ष्य’ चित्रपटात करण नावाच्या तरुण मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. एक असा तरुण ज्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. त्याचे मित्र आपलं करिअर करण्याच्या मार्गी लागले आहेत. पण करणला त्याला काय करायचं आहे? आयुष्यात त्याचं नेमकं लक्ष्य काय आहे? हेच कळतं नसतं. मग बऱ्याच काळानंतर करण ठरवतो की, तो सैन्यता भरती होऊन देशसेवा करणार. त्यानंतर अनेक अडचणींवर मात करून तो लेफ्टनंट करण शेरगिल होतो आणि मग त्याचं खरं लक्ष्य ठरतं. करण हे पात्र अभिनेता हृतिक रोशनने ‘लक्ष्य’ चित्रपटात साकारलं आहे. १९९९च्या कारगिल युद्धावर आधारित असलेली ‘लक्ष्य’ चित्रपटाची कथा आहे.
हेही वाचा – ‘रमा राघव’ मालिकेला रामराम करून केलं थाटामाटात लग्न, आता अभिनेत्री झळकली ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत
प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी ‘लक्ष्य’ या चित्रपटाची कथा लिहिली असून पुन्हा एकदा ती मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. ‘लक्ष्य’ला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंटच्या सोशल मीडिया पेजवरून याची घोषणा करण्यात आली आहे. २१ जूनपासून ‘लक्ष्य’ चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, फरहान अख्तर दिग्दर्शित ‘लक्ष्य’ या चित्रपटात हृतिक रोशन व्यतिरिक्त अभिनेत्री प्रीति झिंटा, अमिताभ बच्चन, बोमन इराणी, ओम पुरी, शरद कपूर, राजेंद्रनाथ झुत्शी, सुशांत सिंह, रणवीर शौरी, अमरीश पुरी, तन्वी आझमी असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.