ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी या सध्या सिनेसृष्टीत सक्रीय नसल्या तरी त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत नायिकेसह खलनायिका म्हणूनही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अरुणा इराणी या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेचे सोने करायाच्या. त्यांनी आतापर्यंत ३०० हून अधिक मराठी, हिंदी, गुजराती अशा विविध भाषिक चित्रपटात काम केले. पण नुकतंच अरुणा इराणी यांनी अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल ४२ वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा सांगितला आहे.
अरुणा इराणी यांनी आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. अरुणा इराणी यांनी नुकतंच एएनआय या वृत्तसंस्थेच्या पॉडकॉस्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. या दरम्यान त्यांना रेखा यांच्यामुळे तुम्हाला ‘मंगळसूत्र’ या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता, हे खरं आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : “कुटुंबाने काम न करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला कारण…”, ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणींचा खुलासा
“रेखा ही माझी खूप चांगली मैत्रीण होती. मी काही वर्षांपूर्वी ‘मंगळसूत्र’ नावाचा एक चित्रपट करत होती. या चित्रपटात मी एका अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीची भूमिका करत होते. यात पहिल्या पत्नीचा मृत्यू होतो, ती भूत बनते, असे दाखवण्यात येणार होते. तर याच चित्रपटात रेखा ही दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारत होती.
एक दिवशी अचानक मला निर्मात्याने तुला या चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे, असे सांगितले. त्यावेळी मी निर्मात्यांकडे गेले आणि त्यांना मला चित्रपटातून का काढून टाकले, काही समस्या आहे का? असे अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी तो निर्माता म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगू तर रेखा यांना तुमच्याबरोबर काम करायचे नाही. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.’
यानंतर मी रेखाला शूटींग सुरु असताना याबद्दल जाब विचारला. “मी तुला या चित्रपटात काम करायला नको आहे, हे खरं आहे का? असे मला निर्मात्यांनी सांगितलं. त्यावर तिने उद्धटपणे ‘हो’ असे मला म्हटले. त्यावर मी याचे कारण विचारले असता ती म्हणाली, “बघ अरुणा, या चित्रपटात माझा अभिनय जरा वर-खाली झाला असता तर मला लोकांनी खलनायक ठरवलं असतं. त्यामुळेच तू ती भूमिका करावी असं मला वाटत नाही.”
त्यावर मी तिला तू ‘हे निर्मात्यांना सांगण्याआधी मला फोन करुन किंवा प्रत्यक्ष भेटून सांगू शकली असतीस. तू हे फार चुकीचं वागलीस.’ त्यावर रेखाने “मला माफ कर. पण मी अजून काय करु शकते. हा माझ्या करिअरचा प्रश्न आहे. त्यामुळे मी हे केलं.” असे म्हटलं होतं.
दरम्यान अरुणा इराणी यांनी ‘बेटा’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘उपकार’, ‘लाडला’, ‘राजा बाबू’, ‘लावारीस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उल्लेखीन भूमिका साकारली आहे. त्यासोबत त्यांनी ‘मैं लक्ष्मी तेरे आंगन की’, ‘देखा एक ख्वाब’, ‘परिचय: नई जिंदगी के सपने का’ आणि ‘झांसी की रानी’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे.