I Want To Talk box office collection Day 7: बॉलीवूड अभिनेता एकीकडे त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे आणि दुसरीकडे त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळेही तो चर्चेचा विषय ठरत आहे. अभिषेक बच्चन अभिनित आणि शूजित सरकार दिग्दर्शित ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून अभिषेकला बऱ्याच अपेक्षा होत्या; मात्र सुरुवातीलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर गडगडला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक सुरुवात केली. अशात नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार, अभिषेक बच्चनच्या आतापर्यंतच्या करिअरमधील सर्वांत कमी कलेक्शनची नोंद करण्यात आली आहे.
चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात अतिशय कमी कलेक्शन केले आहे. ‘सॅकनिल्क‘च्या आकडेवारीनुसार, ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी २५ लाख रुपयांची कमाई झाली. त्यानंतर वीकेंडला शनिवारी आणि रविवारी कमाईत काहीशी वाढ झाली. चित्रपटाने शनिवारी ५५ लाखांची आणि रविवारी ५० लाखांची कमाई केली. त्यानुसार रविवारपर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १.३० कोटींचा गल्ला जमवला होता.
हेही वाचा : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चं फायनल एडिटिंग पूर्ण; प्रदर्शनाआधी निर्मात्यांनी शेअर केला फोटो
ब
दोन कोटींच्या कलेक्शनचा आकडा हुकला
त्यानंतर पुढच्या आठवड्यात चित्रपट आणखी कमाई करून किमान दोन कोटींचा आकडा गाठेल, अशी आशा होती. मात्र, सोमवारी चित्रपटाचं फार निराशाजनक कलेक्शन झालं. तसेच बाकीच्या दिवसांतही फार कमी कमाई झाली. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यातही चित्रपट १.९४ कोटींपर्यंत पोहोचला आणि दोन कोटींच्या कलेक्शनचा आकडा हुकला.
बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, अभिनेता अभिषेक बच्चनच्या २० वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीतील त्याने अभिनय केलेल्या चित्रपटाची ही सर्वाधिक कमी कमाईची नोंद आहे. अभिषेकच्या अभिनयाच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या चित्रपटांची आकडेवारी पाहिली तर, ‘मुंबई से आया मेरा दोस्त’ या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २.११ कोटी रुपये कमावले होते. तसेच २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नाच’ या चित्रपटाने २.३४ कोटींची कमाई पहिल्याच आठवड्यात केली होती. अभिषेकच्या ‘घूमर’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ४.०३ कोटी रुपये कमावले होते.
हेही वाचा : लग्नानंतर ९ वर्षांनी झाली आई, प्रसिद्ध अभिनेत्रीने लाडक्या लेकीचं नाव ठेवलं ‘लीला’
अभिषेकच्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपटाला कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ आणि अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटांनी मोठी टक्कर दिली आहे. त्यात आता या शुक्रवारी ‘मोआना २’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच पुढच्या आठवड्यात बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २’ प्रदर्शित होत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातही अभिषेकच्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ची बॉक्स ऑफिसवरील कमाई आणखी कमी होईल, असे चित्र दिसत आहे.