अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील घरात दरोडेखोराने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या मणक्यात चाकूचे टोक घुसले होते. लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आहे. सध्या अभिनेत्याची प्रकृती स्थिर असून त्याला रिकव्हरी रूममध्ये हलवण्यात आलं आहे. या प्रकरणी सैफच्या जवळच्या व्यक्तीने महत्त्वाची माहिती दिली आहे.

सैफवर हल्ला झाला, तेव्हा करीना व त्यांची दोन्ही मुलं तैमूर आणि जेह घरी होते. सैफ अली खानच्या घरी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरीची घटना घडली. चोर घरात घुसला आणि थेट मदतनीसच्या खोलीत पोहोचला, तिथे चोराला पाहून मदतनीस आरडाओरडा करू लागली. तिचा आवाज ऐकून सैफ आपल्या खोलीतून बाहेर आला आणि चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्याने सैफवर हल्ला करून तेथून पळ काढला.

हेही वाचा – हल्लेखोराला ओळखत होती सैफ अली खानची मदतनीस, पोलिसांना संशय; दोन तासांच्या CCTV फुटेजमध्ये…

सैफ जखमी झाल्यानंतर कुणाल खेमू आणि इब्राहिम अली खान यांना घटनेची माहिती देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इब्राहिम ऑटो रिक्षातून अवघ्या काही मिनिटांत इमारतीजवळ पोहोचला. त्यानंतर तो सैफला त्याच ऑटोतून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. कुणाल आणि इतर कर्मचारी एका कारमध्ये लीलावती रुग्णालयात पोहोचले.

हेही वाचा – ५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी

सैफ व जखमी मदतनीस सध्या लीलावती रुग्णालयात आहेत. सैफवर शस्त्रक्रिया झाली आहे. त्याच्यावर हल्ला करणाऱ्या एका व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सैफच्या भेटीला करीना कपूर, रणबीर कपूर, सारा व इब्राहिम, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्यासह अनेक जण लीलावती रुग्णालयात गेले.

Story img Loader