दिग्दर्शक मधुर भांडारकर हे नेहमीच त्यांच्या चित्रपटातून वेगवेगळे महत्वाचे विषय हाताळत असतात. आता ते त्यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटातून ते कोविड काळातील टाळेबंदीवर भाष्य करणार आहेत. हा चित्रपट लवकरच ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याच संदर्भात नुकतंच मधुर भांडारकर यांनी भाष्य केलं आहे.
कोविड काळात देशातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला, शिवाय या काळात सामान्य माणूस कशा रितीने भरडला गेला यावर मधुर भांडारकर यांनी या चित्रपटाच्या मध्यमातून प्रकाश टाकला आहे. यानिमित्ताने नुकतंच त्यांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी एकाहून एक धमाल प्रश्नांना मस्त उत्तरं दिली आहेत.
आणखी वाचा : विधु विनोद चोप्रा यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा; ‘या’ २ प्रामाणिक सरकारी अधिकाऱ्यांवर बेतलेली असेल कथा
या मुलाखतीमध्ये मधुर यांना बरेच प्रश्न विचारले गेले त्यापैकी एक प्रश्न असा होता की, पुन्हा जर लॉकडाऊन घोषित करण्यात आलं तर त्यांना कोणत्या ३ सेलिब्रिटीजबरोबर एका घरात राहून पुढील चित्रपटाविषयी चर्चा करायला आवडेल? या प्रश्नाचं फारच वेगळं आणि अनपेक्षित उत्तर मधुर यांनी या मुलाखतीमध्ये दिलं आहे.
मधुर म्हणाले, “जर पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला तर मला दिग्दर्शक एस.एस.राजामौली, श्रीराम राघवन आणि अभिनेता शाहरुख खान यांच्याबरोबर एका घरात राहून नव्या चित्रपटावर चर्चा करायला आवडेल.” मधुर भांडारकर यांनी ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी या कलाकारांनी काम केलं आहे. हा चित्रपट २ डिसेंबर रोजी ‘झी ५’या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.