IIFA Awards 2025: ८ मार्चला शनिवारी ‘आयफा डिजिटल पुरस्कार २०२५’ पार पडला. यामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’ आणि सर्वोत्कृष्ट वेब सीरिज ‘पंचायत सीझन ३’ ठरली. तर क्रिती सेनॉनला ( दो पत्ती चित्रपट ) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच विक्रांत मॅसीला ( सेक्टर ३६ चित्रपट ) सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्यानंतर ९ मार्चला, रविवारी ‘आयफा पुरस्कार २०२५’ सोहळा मोठ्या दिमाखात झाला. या पुरस्कार सोहळ्याला बॉलीवूडच्या सेलिब्रिटींचा खास परफॉर्मन्स पाहायला मिळाला. याशिवाय ‘आयफा २०२५’मध्ये अभिनेत्री करीना कपूरने आजोबा राज कपूर यांना आदरांजली वाहिली.
यंदाचा ‘आयफा पुरस्कार २०२५’ सोहळा जयपूरमध्ये आयोजित केला होता. या सोहळ्याला रेखापासून शाहरुख खानपर्यंत सर्व सेलिब्रिटींना खास उपस्थिती लावली होती. ‘आयफा पुरस्कार २०२५’ सोहळ्यात करीना कपूरने आजोबा राज कपूर यांच्या गाण्यांवर जबरदस्त डान्स करून त्यांना आदरांजली वाहिली. करीनाच्या डान्सचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.
‘आयफा पुरस्कार २०२५’मध्ये करीनाने राज कपूर यांच्या ‘श्री ४२०’ चित्रपटातील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ गाण्यावर डान्स केला. तसंच याच चित्रपटातील ‘मेरा जूता है जपानी’ गाण्यावरही अभिनेत्री थिरकली. या मूळ गाण्यातील राज कपूर यांचा हुबेहूब लूक करून करीना डान्स करताना दिसली. तिचा ‘आयफा पुरस्कार’ सोहळ्यातील या परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. करीनाचं नेटकऱ्यांकडून कौतुक होतं आहे.
एका नेटकऱ्याने लिहिलं, “राज कपूर यांना खूप छान पद्धतीने करीनाने आदरांजली वाहिली.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, करीना कपूर आणि रणबीर कपूर राज कपूर यांचा खऱ्या अर्थाने वारसा जपत आहेत. खूप अभिमानस्पद वाटतं. तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “करीनाला दिवसांनंतर पहिल्यामुळे भावुक झालो.”
दरम्यान, ‘आयफा पुरस्कार २०२५’मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘लापता लेडीज’ ठरला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नितांशी गोयल ( लापता लेडीज ) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कार्तिक आर्यन ( भुल भूलैया ३ ) यांना मिळाला. तसंच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्काराची मानकरी किरण राव ( लापता लेडीज ) ठरली.