अभिनेत्री आलिया भट्टने बॉलिवूडबरोबरच हॉलीवूड चित्रपट करीत जगभरात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आलिया आता फक्त अभिनेत्रीच नव्हे, तर निर्माती व उद्योजकदेखील आहे. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या आलियाला नेपोटीजम आणि एकूणच तिच्या स्वभावावरुन प्रचंड ट्रोल केलं गेलं. इतकंच नव्हे तर आलियाला अभिनय येत नाही अशी टिप्पणीही बऱ्याच लोकांनी केली, पण इम्तियाज अली या दिग्दर्शकाबरोबर केलेल्या एका चित्रपटामुळे आलियाचे आयुष्यच बदलले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इम्तियाज अलीच्या ‘हायवे’ या चित्रपटात आलियाने प्रमुख भूमिका निभावली, हा चित्रपट तिच्यासाठी गेम चेंजर ठरला. केवळ समीक्षकच नव्हे तर प्रेक्षकांनीही या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाची प्रशंसा केली. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान इम्तियाज अलीने हे स्पष्ट केलं की सुरुवातीला या चित्रपटासाठी आलिया भट्टला घेणं हे त्याच्या प्लॅनमध्ये नव्हतं. इम्तियाजबरोबर काम करणाऱ्या संपूर्ण युनिटला आलियाच्या निवडीवर शंका होती, पण आलियाने मात्र आपल्या अभिनयाने सगळ्यांची तोंडं बंद केली.

आणखी वाचा : “समांथा रूथ प्रभू ही ३ कोटी लोकांना मूर्ख बनवत आहे”, अभिनेत्रीच्या पॉडकास्टवर एका डॉक्टरांची संतप्त प्रतिक्रिया

मुकेश छाब्रा यांच्याबरोबर ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये इम्तियाज अली म्हणाला, “हायवे या चित्रपटावर काम करताना एखादी वयाने मोठी अन् विचाराने परिपक्व असलेल्या अभिनेत्रीला घेण्याचा माझा विचार होता. आलिया तेव्हा लहान होती, पण तिच्यातली क्षमता मला ठाऊक होती. ती जेव्हा तिच्या आईबरोबर ‘लव शव ते चिकन खुराना’ हा चित्रपट पाहायला आलेली तेव्हा मी आलियाला प्रथम भेटलो. ती सुंदर आहेच पण एक माणूस म्हणून ती फार भावनिकही आहे हे मला जाणवलं. तेव्हा मी तिला माझी स्क्रिप्ट वाचण्यातही पाठवली.”

पुढे इम्तियाज म्हणाला, “तिने त्यानंतर दोन दिवस माझ्याशी काहीच संपर्क केला नाही, नंतर जेव्हा मी स्क्रिप्ट कशी वाटली हे जाणून घेण्यासाठी तिला फोन केला तेव्हा ती ही कथा वाचून फारच आश्चर्यचकित झाल्याचं मला तिने सांगितलं, कारण यात तिच्या अभिनयाला प्रचंड वाव होता, ती प्रत्येक सीनमध्ये दिसणार होती शिवाय एक कलाकार म्हणून करण्यासारख यात बरंच काही होतं. आलियाला या चित्रपटात घेणं हा माझा एक अनपेक्षित निर्णय होता, ती ही भूमिका कशी साकारेल यावर माझ्या संपूर्ण युनिटला शंका होती. त्यामुळे त्यांना पटवून देण्यासाठी ही गोष्ट मी आलियाला तिच्या पद्धतीने सगळ्यांना सांगायला लावली अन् तेव्हा तिच्या तोंडून ही गोष्ट ऐकल्यावर प्रत्येकाची खात्री पटली की आलियाशिवाय कुणीच ही भूमिका करू शकत नाही.” इम्तियाज अली आता लवकरच अमर सिंह चमकीला यांच्या जीवनावर बेतलेला चित्रपट नेटफ्लिक्सच्या माध्यमातून घेऊन येत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imtiaz ali says his entire unit on highway was not convinced about alia bhatt in lead role avn