बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक दिग्गज कलाकारांबरोबर एका लेखक जोडीचे नावदेखील तितक्याच आदराने घेतले जाते. ही जोडी म्हणजे जावेद अख्तर आणि सलीम खान यांची आहे. या दोघांनी एकत्र येत ज्या चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या, त्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

‘सीता और गीता’, ‘जंजीर’, ‘शोले’, ‘दीवार’ अशा अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहित प्रेक्षकांच्या लक्षात राहतील असे सिनेमे निर्माण करण्यात या लेखक जोडीचे योगदान मोठे आहे. जावेद अख्तर पटकथा लिहिण्याबरोबर कवीदेखील आहेत. अनेकदा ते आपल्या वक्तव्यामुळेदेखील चर्चेत असतात.

“तर तुम्हाला शिवी देऊन बोलायची गरज उरत नाही”

आता जावेद अख्तर यांनी ‘चिल सेश विथ सपन वर्मा’ या यूट्यूब चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, कॉमेडी करताना किंवा या संदर्भात शिवी दिली पाहिजे की नाही, याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे? तुम्हाला याबाबत काय वाटते? यावर बोलताना जावेद अख्तर यांनी म्हटले, “तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जगातील कुठल्याही ठिकाणी जिथे गरिबी असते. तिथे मोठ्या प्रमाणात मिरची खाल्ली जाते, कारण त्यांचं जेवण सपक असतं; तर काहीतरी चव पाहिजे म्हणून ते मोठ्या प्रमाणात मिरची खातात. भाषेतील मिरची ही शिवी आहे. जर तुम्ही चांगल्या भाषेत बोलत असाल आणि तुम्ही पुरेसे विनोदी असाल तर तुम्हाला शिवी देऊन बोलायची गरज उरत नाही. जर तुमचे संभाषण फारच रटाळ होत असेल तर तुम्ही तुमच्या बोलण्यात शिव्या देता. संभाषणात उत्साह निर्माण करण्यासाठी शिव्या दिल्या जातात”, असे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: Bigg Boss 18 : पहिल्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया ‘अशी’ पार पडली, गुणरत्न सदावर्तेंसह ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट

दरम्यान, जावेद अख्तर यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. याबरोबरच, मनोरंजनसृष्टीतील योगदानासाठी त्यांना १९९९ ला ‘पद्मश्री’ आणि २००७ ला ‘पद्मभूषण’ या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

सलीम-जावेद या दोघांच्या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपटांच्या कथा लिहिल्या. पण काही कारणाने नंतर ही जोडी वेगळी झाली. खूप वर्षांनी नुकतीच सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या आयुष्यावर आधारित अँग्री यंग मेन ही डॉक्युमेंटरी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात आली. त्यावेळी दोघांनी त्यांच्या कामाबद्दलच्या आठवणी सांगितल्या होत्या.