सध्या देशात इंडिया आणि भारत या दोन नावांची चर्चा चालू आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिया नाव न वापरता भारत हेच नाव वापरण्याचं धोरण केंद्र सरकारने राबवल्याचं दिसून येत आहे. थेट देशाच्या राष्ट्रपतींकडून जी२० देशांच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेतही प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला. यावरुन वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल मोठा निर्णय घेतला आहे.
अभिनेता अक्षय कुमार हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट खाण अभियंता जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या नावात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. नुकतंच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
आणखी वाचा : अखेर अक्षय कुमारला मिळाले भारतीय नागरिकत्व, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत दिली गुडन्यूज, म्हणाला…
अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘कॅप्सूल गिल’ या नावाने प्रदर्शित होणार होता. पण त्यानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाच्या नावात बदल करत ‘द ग्रेट इंडिया रेस्क्यू’ असे नाव चित्रपटाला दिले होते. पण त्यानंतर आता या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. त्यात पुन्हा एकदा चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
अक्षय कुमारच्या ‘द ग्रेट इंडिया रेस्क्यू’ या चित्रपटाचे नाव ‘मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू’ असे असणार आहे. या चित्रपटाचा टीझर ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्याची माहितीही अक्षय कुमारने दिली. इंडिया आणि भारत या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आल्याचे बोललं जात आहे. मात्र हे नाव बदलण्याचे नेमकं कारण काय याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
आणखी वाचा : …म्हणून अक्षय कुमारने स्वीकारलेलं कॅनेडियन नागरिकत्व, स्वत:च खुलासा करत म्हणाला “माझे चित्रपट आपटले अन्…”
दरम्यान अक्षय कुमारचा आगामी चित्रपट खाण अभियंता जसवंत सिंग गिल यांच्या शौर्यावर आधारित आहे. जसवंत सिंग यांनी १९८९ मध्ये ३५० फूट खाली अडकलेल्या ६५ खाण कामगारांची सुखरुप सुटका केली होती. यात अक्षय कुमार हा खाण अभियंता जसवंत सिंग गिल यांची भूमिका साकारत आहे. येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.