Rohit Bal Passed Away : प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचं आजारपणामुळे निधन झालं आहे. ते ६३ वर्षांचे होते. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. गेल्या वर्षभरापासून त्यांना हृदयाशी संबंधित अनेक समस्या होत्या आणि त्यावर उपचार सुरू होते. रोहित यांच्या निधनाची बातमी कळताच कलाविश्वातून व फॅशन इंडस्ट्रीतून शोक व्यक्त केला जात आहे. अनेक सेलिब्रिटी व फॅशन डिझायनर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
रोहित बल यांचा शेवटचा शो लॅक्मे इंडिया फॅशन वीक होता. या शोमध्ये अभिनेत्री अनन्या पांडे शोस्टॉपर होती. अनन्याबरोबर ते रॅम्पवर वॉक करताना दिसले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती फार चांगली नव्हती. त्यांची अवस्था पाहून चाहत्यांना काळजी वाटत होती. त्या इव्हेंटनंतर रोहित पुन्हा कोणत्या इव्हेंटमध्ये दिसले नाही.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत आणि त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. रोहित बल यांचं फॅशन इंडस्ट्रीतील योगदान खूप मोठं आहे. अभिनेत्री सोनम कपूरने त्यांच्याशी शेवटचं बोलणं झालं, तो स्क्रीनशॉट शेअर केला आहे. मसाबा गुप्ता, सब्यसाची, करीना कपूर यांनीही पोस्ट करून रोहित यांना श्रद्धांजली वाहिली.
भारतातील प्रसिद्ध डिझायनर रोहित बल
रोहित बल एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर होते, त्यांनी आतापर्यंत अनेक बॉलीवूड कलाकारांसाठी कपडे डिझाइन केले आहेत. रोहित यांचा जन्म ८ मे १९६१ साली श्रीनगरमध्ये झाला होता. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला होता.
भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सपैकी एक असलेले रोहित बल हे तीन दशकांहून अधिक काळापासून फॅशन इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. त्यांना २००१ आणि २००४ मध्ये इंटरनॅशन फॅशन अवॉर्ड आणि २००६ मध्ये इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये ‘डिझायनर ऑफ द इयर’ म्हणूनही गौरविण्यात आलं होतं. फेब्रुवारी २०१२ मध्ये, त्यांना लॅक्मे फॅशन वीकमध्ये ग्रँड फिनाले डिझायनर निवडण्यात आलं होतं.
हेही वाचा – Video: अभिनेता राजपाल यादवने दिवाळीच्या दिवशी हात जोडून मागितली माफी, नेमकं काय घडलं?
२०१० मध्ये आला होता हृदयविकाराचा झटका
रोहित बल यांना २०१० मध्ये हृदयविकाराचा मोठा झटका आला, त्यानंतर त्यांची प्रकृती फार चांगली राहत नव्हती. नोव्हेंबर २०२३ मध्ये ते आयसीयूमध्ये होते. त्यानंतर ते बरे झाले, मात्र शुक्रवारी (१ नोव्हेंबर) त्यांनी कायमचा निरोप घेतला.