‘मुझको भी तो लिफ्ट करा दे’ या गाण्यामुळे लोकप्रिय झालेला गायक अदनान सामीला कोण ओळखत नाही? भारतात जेव्हा पॉप कल्चर रुजायला सुरुवात झाली तेव्हाच्या पहिल्या फळीतील गायक आणि संगीतकार म्हणजेच अदनान सामी. तो उत्कृष्ट गायक आणि संगीतकार आहेच याशिवाय तो उत्तम कीबोर्ड प्लेयरसुद्धा आहे. मध्यंतरी त्याने स्वीकारलेलं भारताचं नागरिकत्व आणि कमी केलेलं वजन यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता.
पुन्हा त्याने त्याच्या बदललेल्या जीवनशैलीवर आणि घटवलेल्या वजनावर अदनानने भाष्य केलं आहे. ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अदनानने त्याच्या या प्रवासाबद्दल खुलासा केला आहे. अदनान म्हणाला, “माझं वजन आधीपासूनच २३० किलो नव्हतं, लहानपणी मी चांगलाच बारीक होतो. तेव्हा मी रग्बी आणि स्क्वॉशसारखे खेळ खेळायचो. अबू धाबीमध्ये मी स्क्वॉशचा चॅम्पियन होतो. इतकंच नव्हे तर पोलो, हॉर्सबॅक रायडिंगसारख्या खेळातही मी निपुण होतो.”
आणखी वाचा : ‘शार्क टँक इंडिया’ फेम अनुपम मित्तल यांच्या हाताला गंभीर दुखापत; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती
पुढे अदनान त्याच्या वजनाबद्दल म्हणाला, “माझं हे वजन फार नंतर वाढलं, पण तेव्हासुद्धा मी बारीक असतानाचे कपडे माझ्या कपाटात अगदी सांभाळून जपून ठेवले होते. एकेदिवशी माझ्या आईने कपाटातील ते कपडे पाहून हा पसारा आवरायला मला सांगितलं. त्यावेळी मी तिला ठामपणे सांगितलं की नाही, एक दिवस मी पुन्हा हे कपडे परिधान करू शकेन. माझं हे वाक्य ऐकून आईला माझ्यावर अजिबात विश्वास बसत नसे.”
बऱ्याच लोकांना वाटतं की अदनानने ऑपरेशनच्या माध्यमातून वजन कमी केलं आहे, पण तसं काहीही केलं नसल्याचा दावाही त्याने या मुलाखतीमध्ये केला आहे. अदनान सामीचा जन्म इंग्लंडमध्ये झाला, त्याचे पालक पाकिस्तानी असल्याने त्याच्याकडे पाकिस्तानचं नागरिकत्व होतं. २००१ मध्ये अदनानने भारतात पाऊल ठेवलं आणि २०१६ मध्ये त्याला भारतीत नागरीकता मिळाली.