Amitabh Bachchan Coolie injury: अमिताभ बच्चन एका जीवघेण्या अपघातातून बचावले होते, तेव्हापासून ते दोन वाढदिवस साजरे करतात. ‘कुली’ चित्रपटातील एका दृश्याचे शूटिंग करताना त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते आणि बरेच दिवस ते रुग्णालयात होते. बिग बी बरे व्हावे यासाठी देशभरातील त्यांचे चाहते प्रार्थना करत होते. २ ऑगस्ट १९८२ रोजी बिग बी बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले होते. त्यानंतर काही वर्षांनी १९८९ साली अमिताभ यांचे सासरे तरूण कुमार भादुरी यांनी पहिल्यांदाच जावयाच्या अपघाताबद्दल सविस्तर माहिती देणारा लेख लिहिला होता. यावेळी त्यांनी इंदिरा गांधी जेव्हा अमिताभ यांना भेटायला रुग्णालयात आल्या होत्या, तो प्रसंगही सांगितला होता.
अमिताभ बच्चन यांचा अपघात झाल्यावर देशातील लोक जात, धर्म सगळं विसरून त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते, असं भादुरी म्हणाले होते. पण आपले जावई फक्त देवाच्या कृपेमुळे बरे झाले, यावर त्यांचा विश्वास नव्हता. अमिताभ बच्चन यांचे सासरे एक प्रसिद्ध पत्रकार होते. इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियाच्या लेखात ते म्हणाले होते, “अपघातानंतर आम्ही मुंबईत पोहोचलो तेव्हा तिथे खूप जण होते, ज्यापैकी काहींना आम्ही ओळखत होतो आणि काहींना आम्ही ओळखत नव्हतो. पण ते सगळे म्हणाले होते, ‘पूर्ण देश, जात, पात, धर्माचा विचार न करता अमिताभसाठी प्रार्थना करत आहे. त्यांना काहीच होणार नाही’. जर खरंच प्रार्थनेला काही अर्थ असेल तर अमितला काहीच होणार नाही, या विश्वासाने त्या रात्री मी शांत झोपलो.”
रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”
इंदिरा गांधी रडल्या होत्या
अमिताभ बच्चन यांचे सासरे नास्तिक होते. त्यामुळे प्रार्थनांमुळे बच्चन बरे झाले, या लोकांच्या मतांशी ते असहमत होते. बिग बी गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये होते, तेव्हा त्यांना भेटायला इंदिरा गांधी आल्या होत्या, तेव्हाची आठवण भादुरी यांनी सांगितली होती. “दुसऱ्या दिवशी सकाळी जया मला आणि माझ्या पत्नीला ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात घेऊन गेली. तिथे अमित एका बेडवर झोपले होते. त्यांच्या शरीराला अनेक नळ्या लावल्या होत्या, त्यांचे डोळे खोल गेले होते. त्यांना पाहताच माझी पत्नी कोसळली आणि अमित कुजबुजले, ‘बाबा, मला झोप येत नाही.’ मी म्हणालो, ‘काळजी करू नका, झोप येईल,’ मी म्हणतोय त्याचा काहीच फायदा नाहीये, हे माहीत असूनही मी त्यांचे सांत्वन करत होतो. त्यानंतर दोन दिवसांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे वेगवेगळे अमितची भेट घ्यायला आले होते. इंदिरा गांधींना पाहताच अमित पुन्हा म्हणाले, ‘आंटी, मला झोप येत नाही.’ हे ऐकताच इंदिरा गांधी भावुक झाल्या आणि हमसून हमसून रडू लागल्या. ‘नाही, बाळा. तुला झोप लागेल. कधी कधी मलाही झोप येत नाही, काय करावं? असं त्या म्हणाल्या होत्या.’’
बरे झाल्यावर बिग बी काय म्हणाले होते?
अमिताभ बच्चन यांच्यावर अनेक आठवडे उपचार चालू होते. बरे झाल्यावर त्यांनी चाहत्यांचे आभार मानले होते. “मी सर्वांचा आभारी आहे, तुम्ही सर्वांनी मी बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली. लोकांनी मंदिर असो, मशीद असो किंवा चर्च असो, सर्व ठिकाणी माझ्यासाठी प्रार्थना केली. मी तुमच्यापैकी अनेकांना ओळखत नाही, तरीही तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी आता तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे पूर्ण प्रयत्न करेन. धन्यवाद,” असं अमिताभ बच्चन दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.
मनमोहन देसाई यांनी दिग्दर्शित केलेला ‘कुली’ चित्रपट १९८३ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्याकाळी ब्लॉकबस्टर ठरला होता.