आमिर खान(Aamir Khan) व माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘दिल’ हा चित्रपट १९९० साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले होते. दिल या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आमिर खानबरोबर काम करण्याबाबतची आठवण सांगितली. त्याबरोबरच आमिर खानने कयामत से कयामत तक या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याचा हा चित्रपट लोकप्रिय ठरला होता. मात्र, त्यानंतर या अभिनेत्याचे सलग आठ चित्रपट फ्लॉप ठरले. मात्र, दिल या चित्रपटातून त्याला जे यश मिळाले, त्यानंतर आमिर खानने मागे वळून पाहिले नाही, अशीही आठवण इंद्र कुमार यांनी सांगितली आहे. त्याबरोबरच दिल या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिर खान व इंद्र कुमार यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते, असेही वक्तव्य दिग्दर्शकाने केले आहे.
आमिर खानला तो सीन मान्य नव्हता
इंद्र कुमार यांनीएका मुलाखतीत म्हटले, “चित्रपटात असा एक सीन होता, जिथे तो काठी तोडतो आणि त्यानंतर तो लग्न करतो. आमिर खानला तो सीन मान्य नव्हता. तो मला म्हणाला की, इंदू तू वेडा झाला आहेस. स्टूल तोडून कोण लग्न करतं? त्यावेळी आमच्यात मतभेद निर्माण झाले होते. आम्ही सकाळी ९ पासून १ वाजेपर्यंत त्या सीनवर चर्चा करीत होतो. मी आमिरला समजावून सांगितले की, या सीनला लोक टाळ्या वाजवतील आणि माझे म्हणणे खरे ठरले.”, अशी आठवण सांगत इंद्र कुमार यांनी म्हटले की, आमिर खानने हा किस्सा अनेक मुलाखतींत सांगितला आहे.
आमिर खानने काही वर्षांपूर्वी ‘आज तक’ला दिलेल्या एका मुलाखतीत दिल या चित्रपटाच्या गाण्यातील ओळीची लाज वाटत असल्याचे म्हटले होते. “आपण ज्या पद्धतीने हिंदी चित्रपटात स्त्री व पुरुषांना दाखवतो. काहीतरी चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात, त्याचा परिणाम आपण सकारात्मक दाखवतो हे चुकीचे आहे. विशेषत: महिलांना आपण वस्तूच्या रूपात दाखवतो. ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ यांसारख्या गाण्यात मीसुद्धा काम केले आहे. अशा चित्रपटात मी काम केले आहे. ‘खंबे जैसी खडी है, लडकी है या छडी है’ यांसारख्या गाण्यात आपण महिलेला माणूस म्हणत नाही, तर खांब म्हणतोय. मला त्याची लाज वाटते”, असे म्हणत आमिर खानने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
दिग्दर्शक इंद्र कुमार व आमिर खान यांनी ‘इश्क’ व ‘मन’ या आणखी दोन चित्रपटांत एकत्र काम केले आहे. ‘मन’ या चित्रपटात अनिल कपूर व मनीषा कोईराला हे कलाकारदेखील होते. ‘मन’बाबत बोलताना इंद्र कुमार यांनी म्हटले की, हा चित्रपट करताना काहीतरी चुकत असल्याची भावना होती. काहीतरी गडबड आहे, असे वाटत होते. चित्रपट तयार होत असताना एक वेळ अशी होती, जेव्हा आमिर खाननेदेखील त्याच्या या चित्रपटाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. सेटवर आमिर खानने म्हटले होते की, हा चित्रपट कुठेतरी दुसरीकडेच जाताना दिसत आहे. त्याला त्या चित्रपटाबद्दल अविश्वास वाटत होता. त्याला मी सांगितले की, याबद्दल चर्चा केली आहे. आपल्याला विश्वास ठेवावा लागेल.
दरम्यान, आता आमिर खान लवकरच त्याच्या बहुप्रतीक्षित ‘सितारे जमीन पर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.