अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) धकधक गर्ल म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीने एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटांत काम करत स्वत:च्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीला तिच्या सुरुवातीच्या काळात मात्र मोठा संघर्ष करावा लागला. माधुरी दीक्षितचे सुरुवातीचे काही चित्रपट एका पाठोपाठ फ्लॉप ठरले. त्यानंतर १९८८ साली प्रदर्शित झालेला ‘तेजाब’ या चित्रपटातून अभिनेत्रीला मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर १९९० साली प्रदर्शित झालेला ‘दिल’, १९९२ साली प्रदर्शित झालेला ‘बेटा’, ‘हम आपके है कौन’, ‘दिल तो पागल है’ अशा चित्रपटांतून माधुरी दीक्षितला मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र, ८० च्या दशकाच्या अखेरच्या टप्प्यात माधुरी दीक्षितला पनवती असे म्हटले जायचे, अशी आठवण प्रसिद्ध दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी सांगितली आहे.
काय म्हटले इंद्र कुमार?
‘दिल’ व ‘बेटा’ या चित्रपटांचे दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी म्हटले, “आमिर खानचा एकच चित्रपट लोकप्रिय ठरला होता. ‘कयामत से कयामत तक’ हा त्याचा चित्रपट गाजला होता. माधुरी दीक्षितबरोबर त्याने एकाही चित्रपटात काम केले नव्हते. माधुरी दीक्षितला पनवती मानले जायचे. जेव्हा मी माधुरी दीक्षितला आमिर खानबरोबर ‘दिल’ चित्रपटात कास्ट केले तोपर्यंत ठीक होते, मात्र जेव्हा मी तिला ‘बेटा’ या चित्रपटातसुद्धा कास्ट केले, त्यावेळी लोकांनी मला वेडा ठरवले. अनेकांनी मला म्हटले होते की तू वेडा झाला आहेस, तिचा कोणताही चित्रपट चालत नाहीये”, अशा प्रकारे अभिनेत्रीला कोणीही चित्रपटात घ्यायला तयार नव्हते, अशी आठवण इंद्र कुमार यांनी सांगितली आहे.
याबद्दल अधिक बोलताना त्यांनी म्हटले, “त्यावेळी एक अशी मुलाखत आली होती, ज्यामध्ये माधुरी दीक्षित पनवती असून ती ज्या चित्रपटात काम करते तो चित्रपट फ्लॉप ठरतो, असे म्हटले गेले होते. तरीही मी ‘दिल’ व ‘बेटा’ या दोन्ही चित्रपटांवर माधुरीबरोबर काम करायला सुरुवात केली होती. मला तिच्यावर विश्वास होता. मला मनात वाटत होते की या मुलीमध्ये काहीतरी वेगळे आहे.”
इंद्र कुमार यांनी या मुलाखतीत म्हटले की, माधुरी दीक्षितने तिच्यावरील फ्लॉप हा टॅग ‘तेजाब’ व ‘राम लखन’ या गाजलेल्या चित्रपटात काम करत हटवला. मी खूप भाग्यवान होतो. मी माझ्या चित्रपटाच्या शूटिंगला ऑक्टोबर १९८८ ला सुरुवात केली होती. डिसेंबर १९८८ मध्ये ‘तेजाब’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि जानेवारी १८८९ ला ‘राम लखन’ प्रदर्शित झाला, त्यामुळे माधुरीची बिचारी फ्लॉप ही जी प्रतिमा लोकांच्या मनात होती ती बदलली. माझे शेड्यूल ऑक्टोबरनंतर थेट सहा महिन्यांनी होते. त्यावेळी जेव्हा माधुरी आली होती, त्यावेळी ती आधीच सुपरस्टार झाली होती. मोठी स्टार झाल्यानंतर पहिल्या दिवशी तिचे पाय जमिनीवर होते, आतासुद्धा ती तशीच आहे. काहीच बदल झाला नाही”, असे म्हणत इंद्र कुमार यांनी माधुरी दीक्षितचे कौतुक केले आहे.