ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल दोन गट पडल्याचं दिसतंय. प्रभासच्या चाहत्यांनी चित्रपट ब्लॉकब्लस्टर असल्याचं म्हटलंय. पण, दुसरीकडे अनेकांना मात्र विविध कारणांनी हा चित्रपट फारसा आवडला नाही. त्यामुळे ते चित्रपटातील कलाकार व दिग्दर्शकावर टीका करीत आहेत.
या चित्रपटाने जगभरात १४० कोटींची रेकॉर्डब्रेकिंग कमाई केली आहे. ओम राऊतच्या दिग्दर्शनावर लोकांनी चांगलीच टीका केली आहे. चित्रपटात प्रभासला प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत घेतलेलंही प्रेक्षकांना चांगलंच खटकलं आहे. इतकंच नव्हे तर यातील संवादांवरही प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. आता लेखकांनी यातील वादग्रस्त संवाद बदलायचा निर्णय घेतला आहे.
नुकतंच माहिती व सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याविषयी भाष्य केलं आहे. ‘एबीपी’च्या वृत्तानुसार अनुराग ठाकूर म्हणाले की धार्मिक भावना दुखावण्याचाअधिकार कुणालाच दिलेला नाही. CBFC बोर्डाने हा निर्णय घेणं आवश्यक आहे. चित्रपटाचे निर्माते संवाद बदलणार असल्याचं अनुराग यांच्या कानावर आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. निदान हे सरकार असताना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे.
‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यातील वादग्रस्त संवादांमुळे हा वाद आणखी चिघळला. नुकतंच या चित्रपटांचे निर्माते आणि लेखक यांनी यातील वादग्रस्त संवाद बदलण्याच्या निर्णय घेतला असून सोमवारपासून हे नवे संवाद चित्रपटात ऐकायला मिळतील अशी ग्वाहीदेखील दिली आहे. ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास, क्रीती सनॉन, सैफ अली खान अन् देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.