शाहरुख खानला बॉलीवूडमधील किंग खान या नावाने ओळखले जाते. शाहरुखचं वैयक्तिक आयुष्यही एका राजासारखंच आहे. शाहरुख आपल्या अभिनयाच्या जोरावर एका चित्रपटात कोटींची कमाई करतो. अभिनय क्षेत्रात तर किंग खानचा पाय रोवला गेला आहे पण शाहरुख क्रिकेटद्वारेसुद्धा बक्कळ कमाई करतो.
२०२४च्या आयपीलच्या हंगामाला सुरूवात झाली असून कालच ‘चेन्नई सुपर किंग्ज’ विरुद्ध ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ यांचा पहिला सामना पार पडला. ‘चेन्नई सुपर किंग्ज’ने या सामन्यात बाजी मारली. तर आज ‘कोलकाता नाइट रायडर्स’ आणि ‘सनरायझर्स हैदराबाद’ यांचा सामना सुरू झाला आहे. शाहरुख खान ‘कोलकाता नाइट रायडर्स’ या टीमचा मालक आहे. आयपीलमधून दरवर्षी शाहरुखची किती कमाई होते याबद्दल जाणून घेऊयात.
प्रत्येक आयपीएल संघाला टीव्ही ब्रॉडकास्ट आणि बीसीसीआयच्या प्रायोजकत्वातून मिळणाऱ्या कमाईचा काही हिस्सा मिळतो. शाहरुख खान आयपीएलमधील ‘कोलकाता नाईट रायडर्स’ संघाचा मालक आहे. या संघाद्वारे, शाहरुख खान ब्रँड एंडोर्समेंट्स, मॅच फी, फ्रँचायझी फी, BCCI इव्हेंट रेव्हेन्यू आणि बक्षीस रकमेतून भरपूर कमाई करतो. मात्र, यातून त्यांना किती कोटींची कमाई होते, याचा खुलासा झालेला नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान आयपीएलमधील त्याच्या टीममधून दरवर्षी २५० ते २७० कोटी रुपयांची कमाई करतो. मात्र, या सामन्यांमध्ये अंदाजे १०० कोटींचा खर्चही होतो. हा सगळा खर्च खेळाडूंच्या खरेदी आणि व्यवस्थापनावर होतो.
‘कोलकाता नाईट रायडर्स’ची या संघाची कमाई १५० कोटींहून अधिक आहे. या संघात शाहरुख खानची हिस्सेदारी ५५ टक्के आहे, त्यामुळे अभिनेता दरवर्षी आयपीएलमधून ७० ते ८० कोटी कमावतो. संघ जिंकल्यास बक्षीस रकमेतूनही कमाई होते.
हेही वाचा… अनुष्का शर्मा लेक अकायबरोबर भारतात परतणार? IPL मध्ये पती विराटला करणार सपोर्ट
२००८ मध्ये जेव्हा आयपीएल सुरू झाले तेव्हा शाहरुखने अभिनेत्री जुही चावला आणि तिचा पती जय मेहता यांच्या भागीदारीत संघ विकत घेतला. फिल्मफेअरच्या म्हणण्यानुसार, या त्रिकुटाने ७५.०९ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ५७० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीला फ्रँचायझी विकत घेतली होती. ‘कोलकाता नाईट रायडर्स’ आयपीएलमधील तिसरा सर्वात यशस्वी संघ आहे. माजी कर्णधार गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली ‘कोलकाता नाईट रायडर्स’ने २०१२ मध्ये पहिले विजेतेपद आणि २०१४ मध्ये दुसरे विजेतेपद पटकावले.