भारतीय माजी फलंदाज गौतम गंभीरने २०११ ते २०१७ या कालावधीत आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स या शाहरुख खानच्या संघाचं नेतृत्व केलं होतं. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर त्याने या संघाचा मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सांभाळायला सुरूवात केली. गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघाने २०१२ आणि २०१४ च्या विजेतेपदावर नाव कोरलं होतं. मध्यंतरी काही वर्ष त्याने लखनौ संघाचा मार्गदर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. परंतु, यंदाच्या आयपीएल हंगामापूर्वी कोलकाता संघाने मोठी घोषणा केली आहे.
गौतम गंभीर पुन्हा एकदा कोलकाता टीमचा मार्गदर्शक म्हणून संघात सामील होणार आहे. गंभीरच्या पुनरागमनामुळे अभिनेता शाहरुख खानला प्रचंड आनंद झाला आहे. अलीकडेच बादशाहाच्या ‘डंकी’ चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झाल्यावर त्याने एक्सवर (ट्विटर) ‘आस्क एसआरके सेशन’ घेतलं.
शाहरुख खानच्या एका चाहत्याने या एसआरके सेशनमध्ये किंग खानला “गौतर गंभीरला पुन्हा एकदा आपल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात सामील करण्याचं कारण काय?” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेता म्हणाला, “कारण गौतम गंभीर आपला खेळाडू आहे…आपल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आहे आणि आम्ही एक कुटुंब आहोत.”
हेही वाचा : सायली अर्जुनला देणार चक्क डिनर डेटचं सरप्राईज! ‘ठरलं तर मग’ मध्ये येणार ‘असा’ ट्विस्ट, नवीन प्रोमो आला समोर…
शाहरुख खानने चाहत्याला दिलेल्या उत्तराचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, गंभीर दुसऱ्या टीमबरोबर काम करत असतानाही शाहरुख त्याची नेहमी स्तुती करायचा. अलीकडेच दोघांची भेट झाली होती. त्यामुळे गौतम केकेआरमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर केकेआर टीमकडून गौतम गंभीर पुन्हा एकदा मार्गदर्शक म्हणून परतणार याची अधिकृत घोषणा करण्यात आली.