IPS Vishwas Nangare Patil post about Chhaava : ‘छावा’ चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर क्रेझ पाहायला मिळत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे, तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. अभिनेता अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाबद्दल सेलिब्रिटी व राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. अशातच या सिनेमाबद्दल आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी केलेल्या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी विकी कौशलचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या लूकमधील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोबरोबर त्यांनी लिहिलेलं कॅप्शन चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराज हे एक गारूड आहे, मराठी माणसाच्या स्वभिमानाचे, स्फुल्लिंगाचे प्रतीक आहेत, असं पाटील यांनी लिहिलं आहे.
विश्वास नांगरे पाटील यांची पोस्ट
छावा………
ज़िंदा रहे….. काळजाला चिरत जातात या काव्यपंक्ती, ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यांत धगधगत्या सळ्या खुपसल्या जातात, त्यांची जीभ खेचून काढली जाते.
सळसळतात धमन्या, ज्यावेळी त्यांच्या जखमांवर मीठ चोळले जाते!
‘मन के जीते जीत, मन के हारे हार, हार गये जो बिनलढे, उनपर हैं धिक्कार!’
केवढी उमेद केवढी प्रेरणा देणारे हे शब्द! स्वतःला मैदानात भिडायची, लढायची आणि शेवटच्या श्वासापर्यंत झुंझायची ऊर्जा देतात.
‘हाथी घोडे, तोफ तलवारे
फौज तो ‘तेरी सारी हैं
पर जंजिरोंमे जकडा हुआ मेरा राजा
अब भी सब पे भारी हैं!
छत्रपती संभाजी महाराज हे एक गारूड आहे, मराठी माणसाच्या स्वभिमानाचे, स्फुल्लिंगाचे प्रतीक आहे, स्वराज्याच्या स्वप्नाचे जिवंत, मूर्तिमंत द्योतक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रौढ, प्रताप, पुरंदर स्वरूप आहे. असा पराक्रमी, शूर आणि चतुरस्त्र भूप होणे नाही. प्रभु शंभूराजे, शतशः नमन तुम्हाला! काय घ्यावं आम्ही मावळ्यांनी तुमच्या धगधगत्या आयुष्यातून?
आम्ही घ्यावा निर्भयपणा,
आम्ही सोडावी लाचारी आणि गुलामगिरी,
विचारांची आणि कृतींची
आम्ही सोडावं स्वार्थी आणि घुसमटलेलं जगणं,
घ्यावी कणभर तरी आपल्याकडून जिद्द,
करारी बाणा आणि महाराष्ट्र धर्म!
समतेचा, नीतिमत्तेचा शिकावा धडा!
राहावा मनोमनी चिंतावा क्षणोक्षणी,
शेर शिवराज आणि त्यांचा छावा!
जगदंब जगदंब! अशी पोस्ट विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिली आहे.
हेही वाचा – Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड न करता…”
‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस झाले आहेत. या १० दिवसांत चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सिनेमाचं कलेक्शन रोज २० कोटींहून जास्त आहे.
© IE Online Media Services (P) Ltd