Ira Khan on Parents Divorce: आमिर खानची मुलगी आयरा खान ही मानसिक आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोलत असते. ती मेंटल हेल्थ सपोर्ट ऑर्गनायझेशनची संस्थापक आणि सीईओ आहे. ती लोकांना मानसिक आरोग्याबाबत जागरूक करताना दिसते. आता एका मुलाखतीत आयराने तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत भाष्य केलं आहे.
पिंकविलाला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आयरा खानने सांगितलं की तिच्या पालकांच्या घटस्फोटाचा तिच्या मानसिक आरोग्यावर फारसा परिणाम झाला नाही. “ते कधीच आमच्यासमोर भांडले नाही. मुलांसाठी ते नेहमी एकत्र होते. त्यांनी त्यांच्या भांडणांपासून, वादांपासून आम्हाला दूर ठेवलं. हे सगळं घडत असतानाही त्यांचे कुटुंब म्हणून एकमेकांवर प्रेम होते,” असं आयरा म्हणाली.
त्यांचं नातं योग्य पद्धतीने संपलं – आयरा खान
आयरा पुढे म्हणाली, “खरं तर घटस्फोट ही माझ्यावर खूप नकारात्मक परिणाम करणारी गोष्ट नव्हती, पण मी जसजशी मोठी झाले, तसं मला समजलं की हे नातं योग्य पद्धतीने संपलं. कदाचित हे नातं चांगल्यासाठी संपलं असेल आणि कोणतंही नातं संपलं की त्रास होतोच.”
घटस्फोटाच्या मानसिक आरोग्यावरील परिणामांबाबत आयरा म्हणाली…
आमिर खान व रीना दत्ता यांच्या घटस्फोटाचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला, याबद्दल आयराने सांगितलं. “मी माझ्या डॉक्टरांशी चर्चा केली आहे आणि मला समजलंय की मी कोणालाही दोष देण्याची गरज नाही. जे झाले ते स्वीकारलं पाहिजे. माझ्या आई-वडिलांनी आम्हाला सुरक्षित वाटावं यासाठी खूप काम केलं आहे. ते वेगळे झाले तेव्हाही आम्हाला दोघांचं समान प्रेम मिळेल, कुटुंबाला प्रेम मिळेल याची काळजी त्यांनी घेतली,” असं आयरा खान म्हणाली.
आमिर खान व रीना दत्ताचा घटस्फोट
आमिर खान व रीना दत्ता यांनी १९८६ साली प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर १६ वर्षांनी २००२ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. या जोडप्याला जुनैद खान व आयरा खान ही दोन अपत्ये आहेत. घटस्फोटानंतर रीना दत्तानेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला. घटस्फोटानंतरही आमिरचे पहिल्या पत्नीशी चांगले संबंध आहेत.