अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानचं ३ जानेवारी २०२४ रोजी नुपूर शिखरेशी लग्न झालं. आधी त्यांनी मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न केलं आणि नंतर उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने त्यांनी लग्नगाठ बांधली. मुंबईत झालेल्या आयरा नुपूरच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती, कारण ते लग्न थोडं हटके होतं. नुपूर शिखरे घरातून धावत लग्नस्थळी पोहोचला होता. त्याने शॉर्ट्स व बनियनवर लग्न केलं होतं. यासाठी त्याला ट्रोलही करण्यात आलं होतं. आता आयराने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आयरा खान व नुपूर शिखरे हनीमूनसाठी बाली इथं गेले आहेत. तिथून ते त्यांचे फोटो शेअर करत आहेत. आयराने लग्नातील अनेक फोटो तिच्या स्टोरीवर शेअर केले होते. अशातच तिने पती नुपूर शिखरेचा एक फोटो शेअर करत लग्नाच्या दिवशी त्याच्या कपड्यांवरून झालेल्या ट्रोलिंगला उत्तर दिलं आहे.
Video: नुपूर शिखरे धावत पोहोचला लग्नस्थळी, ढोल वाजवत केला जोरदार डान्स, वरातीचे व्हिडीओ व्हायरल
आयरा खानने नुपूर शिखरेचा स्विमिंग पुलाजवळील एक फोटो स्टोरीला शेअर केला आहे. ज्यात तो निळी जीन्स, लेदरचं काळं जॅकेट आणि टोपी घालून दिसत आहे. “तुम्ही लोकांनी त्याला इतकं जास्त ट्रोल केलं की तो आता पूलजवळ जीन्स आणि जॅकेट घालून बसलाय,” असं कॅप्शन आयरा खानने नुपूरचा फोटो शेअर करत दिलंय.
दरम्यान, नुपूर शिखरे लग्नात बनियन व शॉर्ट्सवर धावत पोहोचल्याने त्याला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं होतं. रिसेप्शनमध्ये मात्र नुपूरने कपडे बदलून छान निळी शेरवानी घातली होती. या ट्रोलिंगला आता आयराने नुपूरचा एक फोटो शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलंय.