रेश्मा राईकवार
विचित्र परिस्थितीत अडकलेले, एकमेकांशी काडीमात्र ओळख नसलेले दोन जण आधी फक्त भेटतात, हळूहळू दोन पावलं सोबत चालू लागतात, एकमेकांना समजून घेतात, ओळखतात, जोखतात आणि कुठल्या क्षणी दोघांमध्ये अनामिक घट्ट नातं बांधलं जातं हे पाहणाऱ्याच्या नकळतही त्याच्या मनात घर करून जातं. पडद्यावरच्या त्या दोघांसाठी काळ इथेच थांबावा, त्यांच्या आयुष्यात सगळे आनंदाचे-भरभरून प्रेमाचे क्षण यावेत असं पाहणाऱ्याला वाटत राहतं. काय होणार पुढे या दोघांचं.. ही उत्कंठा मनाला थांबूच देत नाही. गोष्ट तिच्या ओघातच सुरू होते आणि त्याच लयीत संपते, पण संपली तरी ती अनुभवणाऱ्याच्या मनात रेंगाळत राहते. इतका सुंदर अनुभव देणारा ‘मेरी ख्रिसमस’ हा मुळात प्रेमपट नव्हे तर न्वार शैलीतला एक वेगळा रहस्यपट म्हणता येईल.
श्रीराम राघवन हे बॉलीवूडच्या तथाकथित चौकटीतील वा तद्दन व्यावसायिक चित्रपट दिग्दर्शकांच्या गर्दीतलं एक वेगळं नाव. त्यांच्या आजवरच्या चित्रपटांनी कुठलीही रूढ चौकट मानलेली नाही. ती कथा आशय – मांडणीच्या बाबतीतही नाही आणि कलाकारांच्या बाबतीतही नाही. ‘एक हसीना थी’, ‘जॉनी गद्दार’, ‘बदलापूर’ वा ‘अंधाधून’.. या प्रत्येक चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा कुठल्या ना कुठल्या तरी परिस्थितीच्या रेटय़ात अडकलेली आहे. एखादी व्यक्ती सराईत गुन्हेगार नसेलही तरी तिच्या व्यक्तित्वात असलेली काळी बाजू किंवा त्याच्या भवतालात घडलेल्या घटनेतून त्याच्याशी जोडलं गेलेलं रहस्य केंद्रस्थानी ठेवत त्यांनी केलेले चित्रपट आजवर यशस्वी ठरले आहेत. ‘मेरी ख्रिसमस’ हा त्या चित्रप्रयोगांमध्येही एक पाऊल पुढचं ठरला आहे. १९६२ सालच्या फ्रेंच चित्रपटावरून हा चित्रपट बेतलेला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कथेचा काळ कोणता? हे इथे दिग्दर्शक नेमकेपणाने सांगत नाही. पण जेव्हा मुंबई ‘बॉम्बे’ म्हणून ओळखली जात होती हा सुरुवातीला येणारा उल्लेख आणि एकूणच मुंबईची काहीशी धूसर दृश्य प्रतिमा चित्रपटाची कथा मोबाइल वगैरे येण्याच्याही कैक आधीच्या काळातील आहे हे जाणवण्यासाठी पुरेशी ठरते. म्हटलं तर परिकथा वाटावी अशी साधारण रचना आहे, नाताळच्या सणाचा आनंद आहे. ऑपेरा हाऊसच्या धर्तीवरचं जुनं रिगल सिनेमागृह आहे. सुरुवातीच्या फ्रेमपासूनच चित्रपट आपल्याला एका वेगळय़ा काळात घेऊन जातो. सात वर्षांनी मुंबईत आपल्या घरी परतलेला आल्बर्ट (विजय सेतुपती) नाताळची रात्र भटकून काढावी या उद्देशाने बाहेर पडतो. बारमध्ये एका व्यक्तीचा निरोप देण्याच्या निमित्ताने त्याची ओळख मारिया (कतरिना कैफ) आणि तिच्या मुलीशी होते. मारियावर त्या क्षणाला काहीतरी विचित्र परिस्थिती ओढवली आहे याची कल्पना आलेला आल्बर्ट तिचा पाठलाग करत राहतो. मारियालाही ते लक्षात येतं. रात्रीचा वेळ कसा काढायचा या विचारात असलेले हे दोघंही सिनेमागृहात पुन्हा भेटतात. सिनेमा पाहून झाल्यानंतर झोपलेल्या अॅनीला खांद्यावर घेऊन बाहेर पडणाऱ्या मारियाला मदत करण्याच्या निमित्ताने आल्बर्ट तिला तिच्या घरापर्यंत सोडण्यासाठी सोबत करायचं ठरवतो आणि दोन अनोळखी लोकांची एकत्र गोष्ट सुरू होते.
हेही वाचा >>>Video: ‘जय श्री राम’! आयरा खान-नुपूर शिखरेच्या रिसेप्शनमध्ये कंगना रणौतचा नारा, व्हिडीओ चर्चेत
आल्बर्ट आणि मारिया दोघंही अनोळखी आहेत, इतकंच आपल्याला माहिती असतं. मारिया नितांतसुंदर, देखणी अशी.. तर त्याच्या अगदी विरुद्ध आल्बर्टचा चेहरामोहरा. प्रथमदर्शनी प्रेमात पडावं असं त्याच्यात काही नाही; आणि ठरवूनही पडावं असंही काही नाही. तरीही मारिया आतापर्यंत ज्या रेटय़ात अडकली आहे त्याकारणाने असो वा तिच्या मनातला खेळ म्हणून असो, या दोघांमध्ये जवळीक होते. आल्बर्टचा विचित्र, रहस्यमयी भूतकाळ आणि मारियाचा तितकाच रहस्यमय वर्तमान दोन्ही एका क्षणी एकमेकांसमोर येतात. त्यानंतरचा सारा खेळ चित्रपटात पाहावा असाच आहे. अगदी ढोबळ मानाने बोलायचं झालं तर चित्रपटाच्या पूर्वार्धातली या दोघांची कथा म्हणजे परिकथेतील प्रेमाची नशा असलेला आणि उत्तरार्धातला भाग खऱ्या अर्थाने कथेच्या मुळाशी नेणारा, वेगाने पुढे जाणारा आहे. हे दोन्ही भाग प्रेक्षकांना तितकेच खिळवून ठेवतात. आधी पात्रांची ओळख करून देत, त्यांच्या प्रेमात पडायला लावत प्रेक्षकांना त्या कथेचा भाग होता येईल अशा पद्धतीची प्रभावी मांडणी दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी केली आहे. हा चित्रपट खऱ्या अर्थाने दिग्दर्शकाची आपल्या तंत्रावरची पकड आणि त्याच्या कलेप्रति असलेली समरसता दाखवून देणारा आहे. त्याचं कारण या चित्रपटाचं लेखन, पात्रांची निवड सगळय़ाच बाबतीत राघवन यांनी खूप बारकाईने विचार केला आहे. तमिळ आणि हिंदी अशा चित्रपटांच्या दोन आवृत्ती आहेत. आणि हिंदीत चित्रपट करून तो तमिळमध्ये डब करण्याचा सोपा, प्रचलित मार्ग राघवन यांनी वापरलेला नाही. त्यांनी दोन्ही भाषेत एकाचवेळी चित्रपट चित्रित केला आहे. त्यासाठी दोन्ही भाषेत वेगवेगळय़ा लेखकांना घेऊन त्यांनी कथालेखन केलं आहे. दोन्हीकडे मुख्य कलाकार जोडी वगळता इतर त्या त्या प्रांतातील कलाकार आहेत. आणि मांडणी करतानाही काही भाषेच्या अनुषंगाने बदल करण्यात आले आहेत.
हेही वाचा >>>Video: आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शनला पत्नीसह पोहोचले राज ठाकरे, तर आदित्य ठाकरेंची आई व भावासह हजेरी
कलाकारांच्या बाबतीतही खूप विचारपूर्वक निवड त्यांनी केली आहे. मारियाच्या भूमिकेसाठी कतरिना कैफ शिवाय अन्य कुठलीही अभिनेत्री चपखल बसली नसती. ग्लॅमर आणि नृत्य, अॅक्शन यापलीकडे जात दिग्दर्शकाच्या अपेक्षांवर खरं उतरत चांगली व्यक्तिरेखा साकारण्याचं कसब कतरिनाकडे आहे आणि तिने ते या चित्रपटातून सिद्ध केलं आहे. विजय सेतुपती आणि कतरिना ही मुख्य जोडी असू शकते हा विचारच मुळात प्रेक्षकांना धक्का देणारा आहे. दिग्दर्शक म्हणून राघवन यांनी केलेल्या या विचाराला अभिनयाच्या कसोटीवर खरं उतरवण्याचं काम कतरिना आणि विजय सेतुपती यांनी चोख केलं आहे. अभिनयाच्या बाबतीतली विजयची सहजता आणि व्यक्तिरेखा अचूक पकडण्याचं त्याचं कसब यांचा योग्य वापर करत या दोघांकडून उत्तम काम करून घेण्याचं श्रेय राघवन यांनाच जातं. या चित्रपटातील तिन्ही गाणी खूप श्रवणीय आहेत आणि या दोन्ही पात्रांच्या मनातील भावना पुढे नेणारी आहेत. चित्रपटाच्या प्रत्येक तंत्राचा खुबीने वापर करत रहस्यपट, न्वार शैलीची सांगड असलेला आणि तरीही अलवार अनुभूती देणारा ‘मेरी ख्रिसमस’ हा एक वेगळा दिग्दर्शकीय प्रयोग म्हणता येईल.
मेरी ख्रिसमस
दिग्दर्शक – श्रीराम राघवन, कलाकार – कतरिना कैफ, विजय सेतुपती, राधिका आपटे, संजय कपूर, विनय पाठक, टिनू आनंद, प्रतिमा काझमी.