बॉलीवूडचा प्रसिद्ध दिवंगत अभिनेता इरफान खान त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत असल्याचे पाहायला मिळते. १९८८ साली सलाम बॉम्बे या चित्रपटातून छोट्याशा भूमिकेतून अभिनेत्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. इरफान खानने एकापेक्षा एक चित्रपटांतून वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला होता. आता इरफान खानबरोबर ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटात काम केलेल्या राधिका मदान या अभिनेत्रीने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची अभिनेत्याची एक आठवण सांगितली आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटात राधिका मदानने इरफानच्या मुलीची भूमिका निभावली होती. या चित्रपटाची आठवण सांगताना राधिकाने म्हटले, “चित्रपटात असा एक सीन होता, ज्या ठिकाणी तिला दारू प्यायल्याचा अभिनय करायचा होता. त्या सीनची आम्ही तयारी केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक होमी अजदानिया यांनी मला सांगितलं की, दारू प्यायलाचा अभिनय करताना त्या भावना वाढव. आम्ही तो सीन करत होतो, त्यावेळी इरफान सर सेटवर आले आणि त्यांनी आम्हाला म्हटलं की, हे सगळं खोटं आहे. तुम्ही दारू प्यायला आहात हे तुमच्या अभिनयातून मला पटू शकत नाही. हे खोटं असल्याचं मी पकडेन. त्यामुळे सुरुवातीला मी माझ्या अभियातून इरफान सरांना हे पटवून देऊ शकले नाही की, मी दारूच्या नशेत आहे.” अशी आठवण अभिनेत्री राधिका मदानने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सांगितली आहे.

इरफान खान आणि राधिका मदान यांच्या ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटातील बापलेकीच्या जोडीला मोठी पसंती मिळाली होती. मुलीवर जीवापाड प्रेम असणारा बाप मुलीचा हट्ट पूर्ण करीत तिला शिक्षण घेण्यासाठी परदेशात पाठवतो, अशा आशयाचे या चित्रपटाचे कथानक आहे.
राधिका नुकतीच बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारबरोबर ‘सरफिरा’ चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनय करताना दिसली आहे. मात्र, सरफिरा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे.

हेही वाचा: ठरलं तर मग : अखेर झाली मायलेकींची भेट! सुभेदारांच्या घरात प्रतिमाची एन्ट्री, मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो

इरफान खानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे, तर १९८८ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्याला त्यानंतर काही वर्षे चित्रपटसृष्टीत काम मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, नंतरच्या काळात त्याने ‘कारवा’, ‘हिंदी मीडियम’, ‘अंग्रेजी मीडियम’ , ‘ब्लॅकमेल’, ‘पझल’, ‘मर्डर अ‍ॅट तिसरी मंझील’, ‘सात खून माफ’, ”न्यू यॉर्क’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. महत्त्वाचे म्हणजे इरफान खानने फक्त भारतीय चित्रपटांत काम केले, असे नव्हे, तर ब्रिटिश व अमेरिकन चित्रपटांतदेखील महत्त्वाचे योगदान दिले. जगभरतील उत्तम कलाकारांमध्ये त्याची गणना केली जाते. चित्रपटसृष्टीतील ३० वर्षांच्या कारकिर्दीत इरफान खानला सहा फिल्मफेअर अवॉर्ड, आशियन फिल्म अवॉर्ड व राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे योगदान देणारा हा अभिनेता २०२० मध्ये वयाच्या ५३ व्या वर्षी अनंतात विलीन झाला.