दिवंगत अभिनेते इरफान खान यांनी त्यांच्या विविधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या अभिनयाच कौतुक आजही मनोरंजसृष्टीत केलं जातं. ‘पान सिंग तोमर’, ‘अंग्रेजी मीडियम’, ‘लाईफ ऑफ पाय’ अशा अनेक चित्रपटामध्ये त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा बाबिल खानही सिनेसृष्टीत उतरला.
अन्विता दत्त लिखित, दिग्दर्शित ‘कला’ या चित्रपटाद्वारे बाबिलने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. बाबिल सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अभिनयासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. परंतु, अचानक बाबिलने त्याच्या सोशल मीडियावर असं काही शेअर केलं ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.
२४ एप्रिलला रात्री बाबिल खानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली होती. यात त्याने लिहिलं होतं की, “कधी कधी मला हार मानावीशी वाटते आणि सगळं सोडून बाबांकडे जावस वाटतं.” बाबिलच्या या पोस्टने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. दरम्यान बाबिलने ही पोस्ट आता डीलीट केली असली तरी त्याच्याबद्दल काळजी व्यक्त केली जात आहे.
बाबिलने शेअर केलेली ही पोस्ट डीलीट केल्याने त्याच्या दुसऱ्या पोस्टवर चाहते कमेंट करून काळजी व्यक्त करतायत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं , “बाबिल तू कधी हार मानू नकोस” तर दुसऱ्याने लिहिलं, “भावा तू एक हिरा आहेस. कृपया करून कालसारखी पोस्ट पुन्हा टाकू नकोस.” तर एकजण कमेंट करत म्हणाला, “बाबिल तुझे बाबा कधी हार मानणारे नव्हते.” बाबिलच्या काळजीपोटी अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याची विचारपूसदेखील केली आहे.
हेही वाचा… ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायलीला रोज लपवावा लागतो ‘हा’ टॅटू; अभिनेत्रीने व्हिडीओ केला शेअर
काही दिवसांपूर्वी बाबिलने त्याच्या सोशल मीडियावर आई सुतापा सिकदर आणि बाबा इरफान खान यांचा फोटो शेअर केला होता.
दरम्यान बाबिल खानच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, बाबिल ‘द उमेश क्रोनिकल्स’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याला बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह काम करण्याची संधी मिळाली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.