बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूनम पांडेचं सरव्हायकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) निधन झाल्याची माहिती शुक्रवारी (२ फेब्रुवारी) तिच्या टीमकडून देण्यात आली होती. तिच्या मॅनेजरने यासंदर्भात सविस्तर इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. यानंतर अभिनेत्रीच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. त्यामुळे एकंदरीत पूनमच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढत चाललं होतं. अखेर या २४ तास सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर पूनम पांडे जिवंत असल्याचं समोर आलं.
पूनम पांडेने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. “मी जिवंत आहे, कर्करोगामुळे माझा मृत्यू झालेला नाही” असं तिने या व्हिडीओद्वारे स्पष्ट केलं आहे. याशिवाय यामध्ये तिने सर्वांची माफी मागितली आहे. सरव्हायकल कॅन्सर या गंभीर आजाराबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी पूनम आणि तिच्या पीआर टीमने हे पाऊल उचललं होतं हे तिने तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून स्पष्ट केलं. तरुण मुलींनी या आजारावरची लस घ्यावी अन् त्याविषयी लोकांमध्ये चर्चा व्हावी यासाठी पूनमने स्वतःच्या मृत्यूचं हे नाटक रचल्याचं कबूल केलं.
आणखी वाचा : “ती भारतातील सर्वात…” पती सॅम बॉम्बेने केलं पूनम पांडेच्या पब्लिसिटी स्टंटचं समर्थन
तिच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर तिला लोकांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. इतक्या खालच्या थराला जाऊन केवळ पब्लिसिटीसाठी असा स्टंट करणाऱ्या पूनमला अटक करायला हवी अशी मागणी काहींनी केली आहे. मनोरंजनसृष्टीतील बऱ्याच लोकांनी पूनमची कानउघडणी केली आहे. बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खाननेही याबाबतीत टिप्पणी केली आहे.
आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत बाबिल खानने पूनमच्या या कृतीवर सडकून टीका केली आहे. बाबिल लिहितो, “पूनम पांडेच्या मृत्यूचं प्रकरण जे काही गाजतय ते काही योग्य नाही असं मला प्रकर्षाने वाटतं. मी खूप प्रयत्न करतो शांत राहायचा पण याचा मला प्रचंड राग आला आहे. लोकांना जागरूक करण्यासाठी एखाद्या मृत्यूचंअसं खोटं नाटक करणं हे समाजासाठी फार घातक आहे. कॅन्सरच्या बाबतीत लोकांना जागरूक करण्याचा हा अत्यंत चुकीचा मार्ग आहे. कृपया अशा रीतीने लोकांना जागरूक करणं थांबवावं.” बाबिलचे वडील व बॉलिवूड अभिनेता इरफान खानलाही एक दुर्धर कॅन्सर झाला होता अन् यादरम्यान इरफानचं निधन झालं. त्यामुळे या आजाराचं गांभीर्य बाबिलला असल्याने त्याने अशा परखड शब्दांत पूनम पांडेची अन् त्यांच्या एजन्सिची कानउघडणी केली.