काही महिन्यांपासून बी-टाऊनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरच्या बातम्या कानावर पडत आहेत. अलीकडेच सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर दिसले होते. दोघे एकत्र पार्टीत पोहोचले होते. त्यानंतर अनन्याने आदित्य रॉय कपूरच्या ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजच्या प्रीमियरलाही हजेरी लावली होती. नुकतंच दोघांनी लॅक्मे फॅशन विकमध्ये एकत्र रॅम्पवॉक केल्याने या दोघांच्या नात्याबद्दल पुन्हा चर्चा होताना दिसत आहेत.
अनन्या कपूर आणि आदित्य रॉय कपूर खरंच रिलेशनशीपमध्ये आहेत का? खरंच ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत का? यावर अनन्याची आई आणि चंकी पांडेची बायको भावना पांडे हिने भाष्य केलं आहे. अनन्या आणि चंकीप्रमाणेच भावनासुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमावर चर्चेत असते. आपल्या मुलीच्या अफेअरबद्दल होणाऱ्या चर्चेवर नुकतंच तिने मौन सोडलं आहे.
आणखी वाचा : “ही वडील आणि मुलाबरोबर…” अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यावर सेलिना जेटली संतापली, म्हणाली…
‘इटाइम्स’शी संवाद साधताना भावना म्हणाली, “खरी गोष्ट सांगायची झाली तर अनन्या सध्या सिंगलच आहे. आणि या क्षेत्रात अशा लिंकअपच्या चर्चा होतच असतात, एका अभिनेत्रीच्या आयुष्यातली ही खूप किरकोळ गोष्ट आहे. याउलट त्यांना प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम पाहता या सगळ्या गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करतो. कारण सकारात्मक विचार नेहमीच नकारात्मक विचारांवर भारी पडतात.”
याबरोबरच अनन्याची आई तिला कायम पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्ला देते असंही या मुलाखतीमधून समोर आलं. नुकतीच अनन्या साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासह ‘लाइगर’ या चित्रपटात झळकली. त्यावेळीही तिचं नाव विजयसह जोडलं गेलं होतं. आता आदित्य रॉय कपूरबरोबर तिच्या लिंकअपची चर्चा होत आहे. इतकंच नव्हे तर हे दोघे लवकरच साखरपुडादेखील करणार असल्याची चर्चा होत होती, पण अनन्याच्या आईने उत्तर देत या सगळ्या चर्चेला पूर्णविराम दिला.