बॉलिवूडचा पुढील जनरेशनचा सुपरस्टार म्हणून रणबीर कपूरकडे फार आशेने पाहिलं जातं. गेल्यावर्षी रणबीरचा ‘शमशेरा’ चांगलाच आपटला पण ‘ब्रह्मास्त्र’ने मात्र सगळं भरून काढलं. ‘ब्रह्मास्त्र’ सुपरहीट झाला. त्यानंतर नुकताच आलेला ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता रणबीरचा आगामी चित्रपट ‘ॲनिमल’ हा चांगलाच चर्चेत आहे.
या चित्रपटातील रणबीरचा लूक मध्यंतरी व्हायरल झाला होता, त्यानंतर त्याच्या याच नवीन चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली.‘अर्जुन रेड्डी’, ‘कबीर सिंग’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे संदीप वांगा रेड्डी याचे दिग्दर्शक करणार आहेत. हा आजवरचा सगळ्यात जास्त हिंस्त्र असा चित्रपट असणार आहे अशी चर्चा सध्या रंगत आहे. हा चित्रपट वडील आणि मुलाच्या एका वेगळ्याच नात्यावर भाष्य करणारा आहेच पण याबरोबरच यात भरपूर हिंसा, रक्तपात बघायला मिळणार आहे हे याचया पोस्टरवर स्पष्ट झालंच आहे.
आणखी वाचा : शाहरुख खानचा ‘जवान’ ठरलेल्या दिवशीच होणार प्रदर्शित; ‘या’ दीवशी येणार चित्रपटाचा नवा टीझर
आता या चित्रपटाबद्दल एक नवीन माहिती समोर येत आहे. काही मीडिया रीपोर्टनुसार हा चित्रपट १८ वर्षांखालील मुलांसाठी नसणार आहे, आणि ज्यांना ज्यांना हा चित्रपट बघायचा आहे त्यासाठी त्यांना एक वेगळी एनओसी (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट)ची स्लिप भरून द्यावी लागणार असल्याचं म्हंटलं जात आहे. १८ वर्षांखालील मुलांना हा चित्रपट पाहण्यासाठी त्यांच्या पालकांकडून हा फॉर्म भरावा लागणार असल्याचं म्हंटलं जात आहे.
मनोरंजनविश्वात ही गोष्ट प्रथमच होत आहे. या चित्रपटात बरीच हिंसा असल्याने हे पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे. शिवाय यामुळे चित्रपटाची चांगलीच हवा निर्माण होऊ शकते असंही म्हंटलं जात आहे. एकूणच लहान मुलांना अशा चित्रपटापासून दूर ठेवावं हा यामागील उद्देश आहे असं सांगितलं जात आहे. याविषयी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी किंवा इतर कलाकारांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही, पण जर हे असं झालं तर रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ एक वेगळाच इतिहास रचेल.
या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, परिणीती चोप्रा, बॉबी देओल, सौरभ शूक्लासारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत. एका जुन्या मुलाखतीमध्ये संदीप वांगा रेड्डी यांनी हा चित्रपट खूप हिंस्त्र असणार आहे असा खुलासाही केला होता. ११ ऑगस्ट २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.