दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट आगामी अकादमी पुरस्कारांसाठी शॉर्टलिस्ट झाल्याच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. एकीकडे विवेक अग्निहोत्रींनी आपला चित्रपट ऑस्करच्या पहिल्या यादीसाठी शॉर्टलिस्ट झाल्याचं ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे हा चित्रपट अद्याप शॉर्टलिस्ट झाला नसल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहेत. विवेक खोटं बोलत आहेत, असाही दावा केला जातोय. त्यामुळे यात नेमकं सत्य काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
विवेक अग्निहोत्री यांचा दावा
‘काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर दावा केला की हा चित्रपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आला आहे. पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि अनुपम खेर या तिघांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीसाठी निवड झाल्याचेही त्यांनी ट्विट केले आहे.
हा दावा खरा आहे का?
एका बाजूने पाहिल्यास हा दावा बरोबर आहे. खरं तर, ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘कांतारा’ हे दोन्ही अकादमी अवॉर्ड्स २०२३ साठी पहिल्या पात्रता यादीत समाविष्ट ३०१ फीचर फिल्म्सपैकी एक आहेत. पण ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘कांतारा’ व्यतिरिक्त, डझनभर भारतीय भाषेतील चित्रपटांनी (फीचर आणि डॉक्युमेंट्री) या यादीत स्थान मिळवले आहे. खरं तर पहिल्या यादीत शॉर्टलिस्ट होणं आणि एलिमिनेशन लिस्टमध्ये जागा मिळवणं यात फरक आहे.
‘छेल्लो शो’ भारताची अधिकृत ऑस्कर एंट्री
‘छेल्लो शो’ हा ऑस्करसाठी भारताने आपली अधिकृत एंट्री म्हणून ऑस्करमध्ये पाठवलेला चित्रपट आहे. तर ‘आरआरआर’, ‘कांतारा’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’, ‘विक्रांत रोना’ इत्यादी चित्रपट इतर भारतीय भाषांमध्ये नॉमिनेशनसाठी पाठवले असून ते पहिल्या यादीत सिलेक्ट झाले आहेत.
पहिली यादी काय आहे?
नामांकनासाठी विचारात घेण्यास पात्र असलेल्या चित्रपटांची ही यादी असते. दुसरीकडे अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांना शॉर्टलिस्ट केल्याचा अग्निहोत्री यांचा दावा दिशाभूल करणारा आहे. ते फक्त नामांकनासाठी पात्र आहेत. ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’साठी आर माधवन, ‘विक्रांत रोना’साठी किच्चा सुदीप, ‘कांतारा’साठी ऋषभ शेट्टी यांची नावेही या यादीत आहे. त्यामुळे यादीत नावाचा समावेश होणं, यात व शॉर्टलिस्टिंग किंवा नामांकन यामध्ये खूप फरक आहे.
पहिल्या यादीत कोणते चित्रपट येतात?
अकादमी पुरस्कार पात्रता निकषांनुसार, चित्रपटाला तांत्रिक आणि बॉक्स ऑफिसवरील काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यात –
- चित्रपट किमान ४० मिनिटांचा असावा
- निर्धारित ऑडिओ आणि व्हिडीओ मानकांचे पालन केले असावे
- सहा पात्र यूएस मेट्रो क्षेत्रांपैकी एका थिएटरमध्ये चित्रपटाचे सशुल्क स्क्रीनिंग
- रिमाइंडर लिस्टमधील उल्लेख कोणत्याही प्रकारे चित्रपट ऑस्कर नामांकन यादीत स्थान मिळविण्यासाठी तयार असल्याचं सांगत नाही.
९५ वा ऑस्कर सोहळा कधी होणार?
९५ वा ऑस्कर सोहळा १२ मार्च २०२३ रोजी रविवारी होणार आहे. हा शो एबीसीवर ओव्हेशन हॉलिवूड येथील डॉल्बी थिएटरमधून जगभरातील २०० हून अधिक देशांमध्ये थेट प्रसारित केला जाईल.