‘खल्लास गर्ल’ प्रसिद्ध मराठमोळी बॉलीवूड अभिनेत्री ईशा कोप्पिकरचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. ती १४ वर्षांच्या संसारानंतर पती टिम्मी नारंगपासून विभक्त झाल्याचं म्हटलं जातंय. टिम्मी व ईशा यांना ९ वर्षांची मुलगी असून तिचं नाव रियाना आहे. रियाना ईशाजवळ असल्याचं म्हटलं जात आहे.
‘ई-टाइम्स’ ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, “काही काळापूर्वी निर्माण झालेल्या कम्पॅटिबिलीटीच्या समस्येमुळे हे जोडपं वेगळं झालं आहे. त्यांनी लग्न वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही. ईशा घरातून बाहेर पडली आहे आणि तिच्या मुलीसह वेगळी राहत आहे.” त्यानंतर त्यांनी ईशाशी संपर्क साधला असता तिने मेसेज करून उत्तर दिलं. “मला काहीही बोलायचं नाही. याबाबत बोलणं खूप घाईचं ठरेल. मला माझी प्रायव्हसी हवी आहे,” असं ईशा म्हणाली.
धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबासह ख्रिसमस साजरा केला आणि नंतर केली आत्महत्या, घटनेमुळे खळबळ
ईशाने हॉटेलियर टिम्मी नारंगशी २९ नोव्हेंबर २००९ रोजी लग्न केलं रहोतं. काही वर्षांनंतर दोघेही एका मुलीचे पालक झाले. नोव्हेंबर २०२३ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाल्याचं म्हटलं जात आहे. सध्या ईशार तिच्या कामात व्यग्र आहे. तिने घटस्फोटाबाबत सोशल मीडियावरून अधिक माहिती दिलेली नाही. तसेच सध्या आपल्याला याबाबत काहीच बोलायचं नसल्याचं तिने सांगितलं आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर तिने पतीचं आडनाव लावलं आहे, तेही अद्याप तसंच आहे.
ईशाने अनेक लोकप्रिय बॉलीवूड चित्रपट केले आहेत. तिने ‘कृष्णा कॉटेज’, ‘डॉन’, ‘क्या कूल हैं हम’, ‘फिजा’, ‘LOC कारगिल’ आणि ’36 चायना टाउन’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने तेलुगू व मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय. २०१९ मध्ये ईशाने राजकारणात प्रवेश केला. ती भाजपामध्ये सहभागी झाली. ईशा वूमन ट्रान्सपोर्ट विंगमध्ये भाजपा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे.